|Thursday, June 27, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » महाराष्ट्र, गोवा राज्यातील अधिकाऱयांशी माहितीचे आदानप्रदान

महाराष्ट्र, गोवा राज्यातील अधिकाऱयांशी माहितीचे आदानप्रदान 

बेळगाव / प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र आणि गोवा सीमेवरील जिल्हय़ातील अधिकाऱयांशी बेळगाव जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. एस. बी. बोम्मनहळ्ळी यांनी सोमवारी बैठक घेतली. जि. पं. सभागृहातील व्हीडिओ कॉन्फरन्स सभागृहात डॉ. बोम्मणहळ्ळी यांनी महाराष्ट्र व गोवा येथील अधिकाऱयांशी चर्चा केली. या बैठकीत कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग आणि उत्तर गोवा जिल्हय़ातील जिल्हाधिकारी, पोलीस वरि÷ अधिकारी आणि अबकारी खात्याचे अधिकारी उपस्थित होते.

निवडणुकीशी संबंधीत झालेल्या या चर्चेमध्ये महाराष्ट्र व गोवा राज्यातील चार जिल्हय़ातील अधिकाऱयांशी यावेळी चर्चा करण्यात आली. निवडणूक आचारसंहितेचे पालन करणे, सुरक्षितता संबंधीत विषयावरही चर्चा झाली. आंतरराज्य सीमेवर चालणारी बेकायदेशीर दारू वाहतूक रोखणे, वाहनांची तपासणी यासह अन्य सुरक्षा व्यवस्थेसह अन्य विषयावर बैठकीत चर्चा करण्यात आली. बेळगाव जिल्हय़ातील सीमेवर एकूण 56 चेक पोस्ट उभारण्यात आले आहेत. याची माहितीही यावेळी जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. बोम्मणहळ्ळी यांनी दिली.

महाराष्ट्र आणि उत्तर गोवा जिल्हय़ाच्या सीमेवर उभारण्यात आलेल्या चेक पोस्ट बाबत माहिती देण्याचे तेथील अधिकाऱयांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने आंतरराज्य मार्गावर धावणाऱया वाहनांची तपासणी बेकायदेशीरपणे होणारी दारूची वाहतूक रोखण्यासह तिन्हीही राज्यानी परस्पर माहितींचे आदान प्रदान करावे, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

संबंधीत जिल्हय़ांमध्ये तडीपार करण्यात आलेल्या समाज कंटकांची संपूर्ण माहिती सर्व जिल्हय़ातील अधिकाऱयांनी एकमेकांना देण्याबाबत बैठकीत संमती दर्शविण्यात आली. या व्हीडिओ कॉन्फरन्स प्रसंगी बेळगाव उत्तर विभागाचे आयजीपी एच. जी. आर. सुहास, पोलीस आयुक्त बी. एस. लोकेश कुमार, चिकोडी लोकसभा मतदार संघाचे निवडणूक अधिकारी डॉ. राजेंद्र के. व्ही., जिल्हा पोलीस प्रमुख सी. एच. सुधीरकुमार रेड्डी, अबकारी खात्याचे उपायुक्त अरूणकुमार यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.