|Monday, June 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » शहापूर -वडगाव परिसरात रंगोत्सव साजरा

शहापूर -वडगाव परिसरात रंगोत्सव साजरा 

बेळगाव / प्रतिनिधी

परंपरेनुसार वडगाव, शहापूर, जुनेबेळगाव, खासबाग परिसरात सोमवारी रंगोत्सव उत्साहात साजरा केला. होळीच्या पाचव्या दिवशी रंगोत्सव साजरा करण्याची या भागात परंपरा आहे. नागरिकांनी रंगाचा हा उत्सव मोठय़ा प्रमाणात साजरा करून यंदाही आपली परंपरा जपली. तरुण वर्गासह बालचमू तसेच तरुणी आणि महिलावर्गानेही मोठय़ा संख्येने एकत्रित जमून एकमेकांवर विविध रंगांची उधळण करून रंगपंचमी साजरी केली. सोमवारी सकाळपासूनच या उत्सवासाठी लगबग दिसून आली. दुपारी 2 ते 2.30 पर्यंत रंगपंचमीचा उत्साह टिकून होता. यंदा वडगाव तसेच शहापूर परिसरात डीजे व डॉल्बीवर तरुणाई थिरकताना दिसून आली.

यंदा डिजे व डॉल्बीचा वापरही मोठय़ा प्रमाणात झाला. यामुळे रंगोत्सवात चिंब भिजताना आणि रेन डान्स करताना तरुणाईचा उत्साह ओसंडून वाहत होता. शहापूरमधील विविध गल्ल्यांसह गाडेमार्ग, बसवाण गल्ली, नाथ पै सर्कल, भारतनगर, बसवेश्वर सर्कल खासबाग, नाझर कॅम्प, कारभार गल्ली, पाटील गल्ली, मंगाई मंदिर आवार, वझे गल्ली, विष्णू गल्ली, जुनेबेळगाव, आनंदनगर आदीसह परिसरातील तरुणाई डिजेच्या तालावर रेन डान्स करण्यात मग्न होती. यामध्ये तरुणींचा सहभागही मोठा होता. एकमेकांवर रंगांची उधळण करत आणि होळी- रंगपंचमीच्या शुभेच्छा देत मोठय़ा उत्साहात रंगपंचमी साजरी केली.

दुचाकीवरून तरुण मंडळी विविध मार्गावर फिरून रंगोत्सवाचा आनंद द्विगुणीत करीत होते. विविध प्रकाराचे मुखवटे परिधान करून तरुण व बालचमू नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते. काहीठिकाणी पाण्याच्या टँकरद्वारे स्प्रिंकलर लावून रंगोत्सवाचा आनंद लुटला. हा उत्सव शांततेत पार पडण्यासाठी शहापूर पोलीस स्थानकाच्यावतीने योग्य बंदोबस्त केला होता.