|Thursday, June 27, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » युवतीच्या अपहरणप्रकरणी युवकास अटक

युवतीच्या अपहरणप्रकरणी युवकास अटक 

प्रतिनिधी/ सातारा

येथील मध्यवर्ती बसस्थानकाशेजारी रिक्षा स्टॉपवरुन संगमनगरकडे जाण्यासाठी बसलेल्या युवतीने संगमनगर बसस्टॉपनजिक रिक्षा थांबवण्यास सांगून देखील रिक्षा न थांबवता तिचे अपहरण करण्याचा प्रयत्न करणाऱया रिक्षा चालकास पोलिसांनी जेरबंद केले. युवतीने प्रसंगावधान दाखवत धाडसाने रिक्षातून उडी मारली आणि पोलिसांनाही घडला प्रकार सांगितल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सूत्रे हलवत याप्रकरणी संतोष उर्फ नऱया रतन झोंबाडे (वय 29 रा. प्रतापसिंहनगर) याला पाच तासात अटक केली आहे.

सोमवारी सकाळी 11.30 च्या सुमारास यातील पीडित युवती ही सातारा बसस्थानकाशेजारील रिक्षा स्टॉपवरुन संगमनगरकडे जाण्यासाठी बसली. तिच्या सोबत इतरही प्रवासी होते. सहप्रवासी उतरत गेले आणि रिक्षा संगमनगर बसस्टॉपनजिक आल्यानंतर युवतीने रिक्षाचालकास रिक्षा थांबवण्यास सांगितले. मात्र, रिक्षाचालकाने रिक्षा न थांबवता युवती गाडीत एकटीच आहे असे पाहून तिच्या अपहरणाचा प्रयत्न केला. रिक्षा जोरात चालवू लागल्याने शेवटी युवतीने प्रसंगावधान दाखवत रिक्षातून उडी मारली आणि झालेला प्रकार माहुली पोलीस दूरक्षेत्रातील कर्मचाऱयांना सांगितला.

सदरचा गुन्हा गंभीर असल्याने सहाय्यक पोलीस अधीक्षक समीर शेख व शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीपकुमार जाधव यांनी तत्काळ पोलिसांना सूचना देवून वेगवेगळी तपास पथके तयार केली. गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बी. जे. ढेकळे, माहुली चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. एम. पवार व गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कर्मचाऱयांनी तपास सुरु केला. युवतीने सांगितलेल्या वर्णनानुसार संबंधित आरोपीला शोधण्यासाठी 200 च्या आसपास रिक्षांची तपासणी केली.

यावेळी सहाय्यक फौजदार विष्णू खुडे यांना संशयित रिक्षाचालकाबाबत माहिती मिळाली. तपास पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे विविध ठिकाणी जावून संशयिताचा शोध घेतला आता केवळ पाच तासात आरोपी संतोष उर्फ नऱया रतन झोंबाडे यास सापळा रचून ताब्यात घेतले. आरोपीकडे कसून चौकशी केली असता त्याने सदरचा प्रकार केला असल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हय़ात वापरलेली रिक्षा हस्तगत केली असून गुन्हय़ाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक एस. व्ही. खाडे करत आहेत.

वरिष्ठांच्या सूचनेनंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. सी. पोरे, बी. जे. ढेकळे व एस. एम. पवार तसेच सहाय्यक फौजदार विष्णू खुडे, नाईक शिवाजी भिसे, मुनीर मुल्ला, सुनील भोसले, अनिल स्वामी, अविनाश चव्हाण, संतोष भिसे, धीरज कुंभार यांनी या कारवाईत सहभाग घेतला होता. या सर्वांचे वरिष्ठ अधिकाऱयांनी अभिनंदन केले.