|Thursday, June 27, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » आनेवाडी टोलनाक्यावर गुंडाचा गोळीबार

आनेवाडी टोलनाक्यावर गुंडाचा गोळीबार 

वार्ताहर/ आनेवाडी

आशियाई महामार्गावरील आनेवाडी टोल नाका येथे रविवारच्या मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास टोल मागितल्याच्या कारणावरुन चार चाकी वाहनातील गुंडाने पिस्तुलातून हवेत गोळीबार केला व यामध्ये झालेल्या मारहाणीत एक टोल कर्मचारी  जखमी झाला आहे. दरम्यान, गोळीबार करणारा रोहिदास उर्फ बापू चोरगे हा असल्याचे स्पष्ट झाले आहे. तो पुणे येथील मोक्कातील आरोपी असून त्याला जामिनावर मुक्तता झाली आहे.

  याबाबत घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, आनेवाडी टोलनाक्यावर रविवार 25 रोजीच्या मध्यरात्री पांढऱया रंगाची स्विफ्ट कार क्र. एमएच 12- एनजे 302 आणि फॉर्च्युनर कार क्र. एमएच 12- के वाय 6466 व तिसऱया एका कारमधून आलेल्या काही लोकांनी टोल देण्याच्या कारणावरुन टोलनाक्यावरील कर्मचाऱयांना दमदाटी केली. टोल वसुलीमुळे प्रकरण वाढत गेल्याने टोल कर्मचारी व वाहनचालक यांच्यात बाचाबाची झाली. त्याचे पर्यावसन    हाणामारीमध्ये झाले. यावेळी सातारा ते पुण्याच्या दिशेने जात असताना बुथ क्रमांक एक वर ही सगळी घटना घडली. यावेळी बुथवर असणारे कर्मचारी विशाल दिनकर राजे रा. लिंब (ता. सातारा) यांना यावेळी सिमेंट विटने मारहाण करून त्यानंतर  कारमधील एकाने आपल्या जवळील पिस्तुल काढून सुमारे सहा राऊंड हवेत फायर केले. दरम्यान, यामध्ये एक टोल कर्मचारी जखमी झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

 गोळीबारानंतर हल्लेखोर पळून गेले असल्याचे पोलिसांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय तसेच गुह्यांच्या बाबतीत संवेदनशील ठरलेल्या आनेवाडी टोलनाक्यावर गोळीबाराची घटना घडल्यामुळे जिह्यात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर जिल्हा पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱयांनी घटनास्थळी धाव घेतली असून आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना केली असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. जखमी कर्मचारी विशाल राजे यांना तातडीने सातारा येथे पुढील उपचाराकरिता हलविण्यात आले. याप्रकरणी आनेवाडी टोलनाक्यावरील कर्मचारी पांडुरंग घनश्याम पवार (रा. चिंधवली, ता. वाई) यांनी याबाबत भुईंज पोलीस ठाण्यात फिर्याद दिलेली आहे.

  पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या गोळीबार प्रकरणात पुणे येथे नुकताच मोक्कामध्ये जामीन मिळालेल्या रोहिदास ऊर्फ बापू चोरगे याचा समावेश असल्याचे सांगितले. चोरगे हा मूळचा वेल्हा तालुक्यातील असून भारती विद्यापीठ, आंबेगांव, वेल्हा या भागात त्याची दहशत असल्याचे सांगितले. कोल्हापुर येथून सभा आटपुन पुण्याच्या दिशेने जाताना सर्व प्रकार आनेवाडी टोल नाक्यावर घडला आहे. या प्रकाराबाबत टोल व्यवस्थापनासह स्थानिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.