|Monday, June 17, 2019
You are here: Home » विविधा » 50 वर्ष भारतात राहणाऱया पाकिस्तानी नागरिकाला भारतीय पासपोर्ट मिळणार

50 वर्ष भारतात राहणाऱया पाकिस्तानी नागरिकाला भारतीय पासपोर्ट मिळणार 

ऑनलाईन टीम / मुंबई :

मागील 50 वर्षांहून अधिक काळ भारतात राहणाऱया पाकिस्तानी नागरिकाला अखेर भारतीय नागरिकत्व देणार असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाने मुंबई उच्च न्यायालयाला दिली आहे.

येत्या दहा दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होईल, अशी हमी कोर्टाला देण्यात आली आहे. यामुळे मागील 50 वर्षांपासून मुंबईत राहणाऱया आसिफ कराडिया यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कराडिया कुटुंबीय हे मूळचे गुजराती आहेत, मात्र फाळणीनंतर पाकिस्तानमध्ये गेलेल्या आई-वडिलांमुळे याचिकाकर्ते कराडिया यांचा जन्म कराचीमध्ये झाला आहे. त्यांच्या जन्मानंतर अवघ्या काही दिवसांतच त्यांना आईने मुंबईत आणले होते. तेव्हापासून ते भारतातच राहत असून पाकिस्तानशी संबंधित कोणतीही अधिकृत कागदपत्रे त्यांच्याकडे नाहीत. साल 2016 मध्ये त्यांचा दीर्घकालीन व्हिसा रद्द झाला आहे. त्यानंतर त्यांनी संबंधित विभागाकडे नुतनीकरणासाठी अर्ज केला होता. मात्र जोपर्यंत पाकिस्तानी पारपत्र दाखल करत नाही तोपर्यंत त्यांना व्हिसा देण्यास भारतीय अधिकाऱयांनी नकार दिला होता.

 आसिफ यांनी भारतीय नागरिकत्वासाठी सात वर्षांपूर्वी अर्जही केला आहे. मात्र त्यावरही अद्याप निर्णय झालेला नाही. मुंबईत एका रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱया कराडिया यांना पत्नी आणि तीन मुले असा परिवार आहे. त्यांच्या नागरिकत्वाच्या अर्जावर निर्णय होईपर्यंत त्यांना व्हिसा मंजूर करावा, अशी मागणी त्यांनी ऍड आशिष मेहता आणि ऍड सुजय काटावाला यांच्यामार्फत याचिकेद्वारे केली होती.