|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » अक्रूराचा धृतराष्ट्राला उपदेश

अक्रूराचा धृतराष्ट्राला उपदेश 

प्रजा पांडवांवरच अधिक प्रेम करते, हेही दुर्योधनादिकांना सहन होत नाही. म्हणून त्यांनी पांडवांवर विषप्रयोग इत्यादीकरून त्यांच्यावर अत्याचार केलेले आहेत, असेही अक्रूराला समजले. अक्रूर राजा धृतराष्ट्राकडे गेला. राजा आपल्या पुत्रांचा पक्षपाती होता आणि पांडवांशी त्याचे वर्तन पुत्रांसारखे नव्हते.

 अक्रूराने सर्वांसमक्ष श्रीकृष्णांचा मित्रत्वाचा संदेश त्याला पाठविला. अक्रूर म्हणाला-महाराज धृतराष्ट्र, आपला बंधू पांडू स्वर्गाला गेल्यावर आपण आता राज्यावर बसला आहात. आपण धर्मानुसार पृथ्वीचे पालन करावे. सदाचरणाने प्रजेला प्रसन्न ठेवावे आणि स्वजनां-बरोबर समान वर्तन ठेवावे. असे करण्याने आपल्याला लोकांमध्ये यश आणि परलोकी सद्‍गती प्राप्त होईल. आपण जर याच्या विपरीत आचरण कराल, तर या लोकी निंदा होईल आणि मृत्यूनंतर नरकात जावे लागेल; म्हणून आपले पुत्र आणि पांडव या दोघांशीही समानतेने वागा.

  आपल्याला माहीतच आहे की, या जगात कधीही, कोणीही, कोणाहीबरोबर कायमचा राहू शकत नाही. राजन, हीच गोष्ट आपल्या शरीराच्या बाबतीतही आहे. तर मग स्त्री-पुत्रादिकांविषयी काय सांगावे? जीव एकटाच जन्माला येतो आणि एकटाच मरून जातो. आपल्या कर्मानुसार पाप-पुण्याचे फळसुद्धा एकटाच भोगतो. अधर्माने मिळविलेले मूर्खाचे धन स्वजन लुटतात. जसे पाण्यात राहणाऱया जंतूंचे सर्वस्व असलेले पाणी त्यांचे संबंधितच संपवून टाकतात.

 जो माणूस, आपले समजून ज्यांचे अधर्मानेही पालनपोषण करतो, तेच प्राण, धन, पुत्र इत्यादी त्या मूर्खाला त्याच्या इच्छा अपुऱया ठेवूनच निघून जातात. खरे म्हणाल तर, जो आपल्या धर्माला विन्मुख आहे, त्याला व्यावहारिक स्वार्थसुद्धा समजत नाही. ज्यांच्यासाठी तो अधर्म आचरतो, ते तर त्याला वाऱयावर सोडतातच, शिवाय त्याला कधीच समाधान लाभत नाही आणि शेवटी तो घोर नरकात जातो.

त्यावर धृतराष्ट्र म्हणाला-हे उत्तम सल्ला देणारे अक्रूर महोदय! आपण माझ्या कल्याणाचीच गोष्ट सांगत आहात. मनुष्याला अमृत मिळाले, तर तो जसा तृप्त होत नाही, त्याचप्रमाणे मी सुद्धा आपल्या या उपदेशाने अजूनही तृप्त झालो नाही. असे असूनही, हे साधो! आपण करीत असलेला हा हिताचा उपदेश, माझ्या चंचल चित्तात स्थिर होत नाही. कारण पुत्रांच्या ममतेमुळे माझे मन विषम झाले आहे.

सर्वशक्तिमान भगवान पृथ्वीवरील भार उतरविण्यासाठी यदुकुलात अवतीर्ण झाले आहेत. त्यांची जशी इच्छा असेल, तसेच होईल. भगवंतांच्या मायेचा मार्ग अचिंत्य आहे. त्या मायेच्या द्वाराच ते या जगाची निर्मिती करून त्यात प्रवेश करतात आणि कर्म व कर्मफलाची वाटणी करतात. या जगच्चक्राच्या निर्वैध चालीमागे त्यांच्या अचिंत्य लीलाशक्ती व्यतिरिक्त दुसरे कोणतेच कारण नाही. त्याच परमैश्वर्यशाली प्रभूंना मी नमस्कार करतो.

Ad. देवदत्त परुळेकर