|Thursday, June 27, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » राजकीय पुढाऱयांचा पोशाख

राजकीय पुढाऱयांचा पोशाख 

प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचे `Dress Face & Address’ हे तीन मुख्य पैलू असतात. वैयक्तिक स्वरूपात व्यक्तीला लागू होणाऱया या बाबी सामाईक वा राजकीय संदर्भात राजकीय पुढाऱयांनापण लागू होतात. या पुढाऱयांच्या संदर्भात वरील तीन बाबींपैकी पोशाख ही बाब सर्वाधिक महत्त्वाची असते ही एक वस्तुस्थिती आहे.पोशाखाच्या संदर्भात विशेष चोखंदळ असणारे आपले पुढारी बिहारच्या चंपारण्य जिल्हय़ातील मोहमद अझिमूर रेहमान या युवा डेस डिझाईनरचा सल्ला व शैली यांना विशेष पसंती देतात. मोहमद रेहमान यांच्या डिझाईननुसार कुर्ता-पायजामा-जाकीट या पेहरावाला लालूप्रसाद यादव, शरद यादव, रामविलास पासवान, प्रेमचंद गुप्ता, भाजपा नेते शाहनवाज हुसेन व राजीवप्रताप रूडी इ. मंडळी आपला पोशाख करतात एवढे सांगणे पुरेसे ठरते. मोहमद रेहमान यांच्या मते नेतेमंडळी आपल्या पोशाखाच्या संदर्भात नेहमीच काळजी घेतात व त्यांच्या या पोशाखी काळजीची पूर्तता करणे हाच त्यांचा व्यवसाय झाला आहे.

तसे पाहता बिहारच्या एका शहरात सर्वसाधारण स्वरूपाचे शिलाई काम करणाऱया मोहमद रेहमान यांच्या व्यवसायाला राजकीय पुढाऱयांसाठी विशेष पोशाख शिवण्याची पहिली संधी 2003 मध्ये लालूप्रसाद यादवांमुळे प्राप्त झाली. त्यावेळी लालूप्रसादना पाकिस्तानमध्ये जायचे होते व त्यादृष्टीने त्यांनी मोहमद रेहमान यांना विशेष स्वरूपाचा कुडता पायजमा बनविण्यास सांगितला. त्यानुसार त्यांनी बनविलेला कुर्ता-पायजमा त्यांना एवढा पसंत पडला की ती शैली लालूंजींनी कायमची स्वीकारली. एवढेच नव्हे तर गेली अनेक वर्षे लालूजी त्यांचेकडूनच आपले कुर्ते शिवून घेत आहेत. राष्ट्रीय स्तरावरील पुढाऱयांकडून त्यांच्या कुर्ता-पायजमा व जाकीट या पोशाखाची विविध पुढाऱयांकडून मागणी-विचारणा होत असल्याने मोहमद रेहमानने बिहारच्या चंपारण्य जिल्हय़ातून आपला मुक्काम हलवून दिल्लीत त्यांनी एक छोटेखानी स्टुडिओच थाटला आहे. पुढाऱयांची पांढऱया कापडाला विशेष पसंती असते व त्यांचे कपडे शिवताना खूपच काळजी घ्यावी लागते असे ते स्वानुभवातून सांगतात. प्रसंगी पुढारी-मंत्र्यांच्या घरी जाऊन त्यांचे पोशाख शिवण्यासाठी 10 ते 12 हजार रु. घेतात. नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीमधून फॅशनसह शिवणकामाचे प्रशिक्षण पूर्ण करणाऱया मोहमद रेहमान यांनी निवडणूक काळात विविध नेत्यांसाठी रातोरात डझनांनी पोशाख शिवण्यापासून एका मंत्र्याची ऐनवेळी मंत्रिपदी वर्णी लागल्यावर केवळ 2 तासात त्यांचा पोशाख शिवण्याचा यशस्वी विक्रम केला आहे.

द. वा. आंबुलकर