|Monday, June 17, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » सत्य की ‘आभास’?

सत्य की ‘आभास’? 

अमेरिकेतील 2016 च्या अध्यक्षीय निवडणुकीत बाजी मारण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचार यंत्रणेने रशियाशी संधान साधल्याचा कुठलाही पुरावा उपलब्ध नसल्याचा अहवाल अमेरिकेतील विशेष वकील रॉबर्ट म्युलर यांनी दिला आहे. त्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना मोठा दिलासा मिळाल्याचे दिसत आहे. किंबहुना, केवळ पुरावा अनुपलब्ध असल्याने एखादय़ा व्यक्तीला निर्दोषत्वाचे प्रमाणपत्रही देता येत नाही. हे पाहता ट्रम्प यांच्याभोवती हलकेसे का होईना, यापुढेही संशयाचे मळभ राहणारच आहे. ट्रम्प हे एक जागतिक राजकारणातील वादग्रस्त व्यक्तिमत्त्व मानले जाते. करचुकवेगिरी, उच्छृंखलपणा, वाचाळपणासाठी प्रसिद्ध असणाऱया ट्रम्प यांनी 2016 ची निवडणूक खऱया अर्थाने गाजवली. खरे तर या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाच्या हिलरी क्लिंटन यांचे पारडे जड होते. मात्र, ट्रम्प यांनी अनपेक्षितपणे विजयश्री खेचून आणली. ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी मुस्लिम समाजाला टार्गेट केले. गर्भपात करणाऱया महिलांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, असे वादग्रस्त विधान करण्यापासून ते जगभरातील स्थलांतरितांवर बंदीची कुऱहाड घालून अमेरिकन नागरिकांनाच रोजगाराकरिता प्राधान्य दिले जाणार असल्याची भूमिका प्रचारादरम्यान स्पष्टपणे जाहीर केली. अमेरिकेतील गौरवर्णीय तरुणांमधील बेरोजगारीचे वाढते प्रमाण हा मुद्दा त्यांनी अत्यंत आक्रमकपणे मांडला. तोच त्यांच्या विजयाच्या दृष्टीने टर्निंग पॉईंट असल्याचे मानले गेले. मात्र, ट्रम्प यांच्या यशात रशियन कनेक्शनही महत्त्वपूर्ण ठरल्याची माहिती पुढे आली नि सारा गहजब झाला. ट्रम्प यांच्यासाठी जी प्रचार यंत्रणा राबविण्यात आली, त्या यंत्रणेने रशियाशी संधान साधत आपला कार्यभार साधल्याची वदंता आहे. वास्तविक अमेरिका व रशिया या दोन राष्ट्रांमध्ये महासत्तापदासाठी शीतयुद्ध काळापासून मोठा संघर्ष असल्याचे अवघ्या जगाने पाहिले आहे. मात्र, विभाजनानंतर रशियासारखा देश काहीसा मागे पडला, तर अमेरिकेकडे निर्भेळ महासत्तापद आले. तथापि, पुढच्या टप्प्यात या दोन राष्ट्रांच्या संबंधांमध्ये चढउतार राहिले. तरीदेखील या देशांनी एकमेकांमध्ये या ना त्या माध्यमातून रस घेतल्याचे वेळोवेळी दिसून आले. अमेरिकेच्या निवडणुकीबाबत तसेच म्हणता येईल. ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन हे परस्परांचे जीवश्चकंठश्च मित्र. अलीकडे त्यांच्या संबंधांमध्ये काहीशी कटुता आली असली, तरी त्यांचा दोस्ताना सर्वश्रुत आहे. ट्रम्प पक्के व्यावसायिक, पाताळयंत्री, तर पुतीनही पक्के धोरणी अन् तितकेच धूर्त. पुतीन यांच्या रशियाने हेरगिरी करीत अमेरिकेतील निवडणुकीवर प्रभाव टाकला, असे म्हणतात. अर्थात हा निर्णय एकतर्फी असण्याची शक्यता नाही. परस्पर सामंजस्यातूनच हे घडले असणार. हिलरी क्लिंटन यांच्या अकाऊंटमधील कथित ई-मेल्स हॅक करण्याचा सल्ला देणे किंवा इतर तांत्रिक कट कारस्थाने काय, या सगळय़ा गोष्टींमध्ये कुठे ना कुठे रशियाचे नाव येत गेले. स्वाभाविकच ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदावर विराजमान होण्यासाठी रशियाची मदत घेतल्याचे ठळकपणे समोर आले. प्रत्यक्षात याबाबतच्या चौकशीत ट्रम्प यांना क्लीन चिट मिळाल्याचे पहायला मिळत आहे. रशियाने हस्तक्षेप केल्याचे म्हटले जात असले, तरी स्वत: अध्यक्ष महोदयांनी मदत घेतल्याचे कोणतेही पुरावे उपलब्ध झालेले नाहीत. त्यामुळे या प्रकरणात ट्रम्प यांचा कोणताही हात नाही, असा निष्कर्ष अमेरिकेच्या न्याय विभागाने काढला आहे. या संदर्भातील तपासात निवडणुकीदरम्यान काही कट करण्यात आला होता का किंवा ट्रम्प यांनी रशियाशी संधान साधले होते काय, या अनुषंगाने तपास करण्यात आला. मात्र, त्यात काहीही तथ्य आढळून आले नाही, असे या अहवालात नोंदविण्यात आले असून, ऍटर्नी जनरल विल्यम बर्र यांनी काँग्रेसला पत्र पाठवून त्याची माहिती दिली आहे. तपास अधिकाऱयाच्या म्हणण्यानुसार या प्रकरणात ट्रम्प यांच्याविरोधात थेट पुरावे नाहीत. पण, म्हणून त्यांना निर्दोष ठरवता येत नाही, अशी पुस्तीही जोडण्यात आली आहे, ती खरीच आहे. कायद्यामध्ये सबळ पुराव्याअभावी एखाद्याची मुक्तता करता येते. पण, म्हणून ती व्यक्ती पूर्णपणे निर्दोष, स्वच्छ आहे, असे मानता येत नाही. ट्रम्प यांच्याबाबतदेखील तसेच म्हणावे लागेल. जगातील कोणतेही राष्ट्र असो, तेथील राजकारण वा निवडणुका कुठल्या दिशेने जातील, याचा अंदाज कधीही कुणीही बांधू शकत नाही. निवडून येण्यासाठी उमेदवार, पक्ष कोणकोणत्या क्लृप्त्या लढवतात, लबाडय़ा करतात, हे भारतासारखा देश चांगला ओळखून आहे. अभद्र युती हा तर अलीकडे राजकारणातील परवलीचा शब्द होऊन बसला आहे. कोण कधी एकत्र येतील आणि सत्तेसाठी कुठला खेळ खेळला जाईल याचा नेम नाही. व्यक्तिस्वातंत्र्य, उदारमतवादासह जगातील सर्वात शक्तिशाली लोकशाही म्हणून जग अमेरिकेला ओळखते. पण, म्हणून अमेरिकेत सगळी पारदर्शकता आहे, तेथील राजकारणी धुतल्या तांदळासारखे आहेत असे मानायचे कारण नाही. ट्रम्प यांच्यासारख्या राजकारण्यांनी ते पुनः पुन्हा दाखवून दिले आहे. वंशद्वेष, अतिरेकी राष्ट्रवादाची मांडणी करणाऱया या नेत्याने निवडणूक जिंकण्यासाठी कुठल्याही थराला जाण्याचे आपले अभूतपूर्व कौशल्यदेखील दाखवून दिले आहे. त्यांना दिलासा मिळत असेल, तर निश्चितच तपासयंत्रणेच्या निष्पक्षतेविषयीही प्रश्नचिन्ह निर्माण होते. ट्रम्प यांची प्रतिमा अमेरिकेमध्ये तेव्हाही फार चांगली नव्हती. आजही ती उजळलेली नाही. त्यांच्यासारखा उमेदवार सगळे अंदाज मोडीत काढून हिलरींविरोधात सनसनाटी निकाल नोंदवतो, हेच मुळात आश्चर्य आहे. रशियन रसद, हीच त्यांच्या अध्यक्षपदासाठी सुकर ठरली का, याचे उत्तर मिळण्याची आजतरी सुतराम शक्यता नाही. स्वाभाविकच अहवालातील निष्कर्ष हे अंतिम सत्य आहे की केवळ आभास, हा प्रश्न तूर्तास तरी अनुत्तरीतच राहणार आहे.