|Thursday, June 27, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » उमेदवारीवरून भाजपमध्ये गोंधळ कायम

उमेदवारीवरून भाजपमध्ये गोंधळ कायम 

प्रतिनिधी/ बेंगळूर

लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार ठरविण्याच्या अंतिम टप्प्यात अदलाबदल करण्याची परंपरा भाजपने सुरूच ठेवली आहे. बेंगळूर दक्षिण आणि बेंगळूर ग्रामीण मतदारसंघांमध्ये राज्य भाजप कार्यकारिणीने केंद्रीय निवडणूक समितीकडे शिफारस केलेली नावे डावलून आपण स्वतः केलेल्या पाहणी अहवालाच्या आधारे उमेदवारांची निवड केली आहे. त्यामुळे दक्षिण भागातील भाजप नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. त्यामुळे दोन इच्छुकांमधील चढाओढीचा लाभ तिसऱयालाच होण्याची शक्यता आहे.

राज्यातील पहिल्या टप्प्यात दक्षिण कर्नाटक भागातील 14 लोकसभा मतदारसंघांमध्ये 18 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. मंगळवारी या मतदारसंघांमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. दरम्यान, बेंगळूर उत्तर आणि बेंगळूर ग्रामीण लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी रात्री उशिरा उमेदवारांची घोषणा करण्यात आली. बेंगळूर उत्तरमधून दिवंगत केंद्रीय मंत्री अनंतकुमार यांच्या पत्नी तेजस्विनी अनंतकुमार यांना तिकीट मिळेल अशी चर्चा असतानाच अचानक तेजस्वी सूर्या यांना उमेदवारी घोषित करण्यात आली. त्यामुळे अनंतकुमार यांच्या समर्थकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

सहा वेळा लोकसभेवर निवडून आलेल्या अनंतकुमार यांच्या निधनामुळे त्यांच्या पत्नी तेजस्विनी यांना भाजप वरिष्ठांनी तिकीट द्यावे, अशी मागणी अनंतकुमार यांच्या समर्थकांनी केली होती. मात्र, या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.

दुसरीकडे बेंगळूर ग्रामीणमध्ये माजी मंत्री सी. पी. योगेश्वर यांची मुलगी निशा योगेश्वर यांना तिकिट निश्चित असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु, येथे माजी विधानपरिषद सदस्य अश्वथ नारायण यांना तिकीट देण्यात आले. त्यामुळे दोन्ही मतदारसंघांमधील भाजप नेत्यांचा एक गट संतप्त झाला आहे. या गटात प्रमुख भाजप नेत्यांचा समावेश आहे. भाजप हायकमांडने घेतलेल्या निर्णयामुळे नाराज झालेले नेते पक्षाच्या उमेदवाराच्या अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित राहिले नाहीत.

सहानुभूतीच्या आधारे आपल्याला लोकसभा निवडणुकीत विजय मिळेल, अशी अपेक्षा गृहीत धरून तेजस्वीनी अनंतकुमार मठ-मंदिरांना भेटी दिल्या होत्या. स्थानिक भाजप कार्यकर्त्यांतच्या सभा तसेच वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेतल्या होत्या. उमेदवारी आपल्यालाच मिळेल, असा विश्वास असतानाच तेजस्वीनी अनंतकुमार यांना डावलण्यात आले. भाजप हायकमांडने ऐन वेळी राज्य भाजप कार्यकारिणीने शिफारस केलेल्या यादीत बदल करून तेजस्वी सूर्या यांना उमेदवारी घोषित केली आहे. भाजपच्या राष्ट्रीय समितीने केलेल्या पाहणीच्या आधारे ही निवड केल्याचे समजते.

बेंगळूर ग्रामीण मतदारसंघातही अपेक्षेपेक्षा दुसराच उमेदवार निवडण्यात आला आहे. या मतदारसंघातून भाजपच्या संभाव्य उमेदवांच्या यादीत आमदार सी. पी. योगेश्वर यांचे नाव होते. मात्र, योगेश्वर यांनी निवडणूक लढविण्यास नकार दिला. आपल्याऐवजी आपली मुलगी निशा हिला तिकीट द्यावे, अशी मागणी त्यांनी केली होती. याच मतदारसंघात जिल्हा भाजप अध्यक्ष रूदेश यांच्या नावाचीही उमेदवारीसाठी शिफारस करण्यात आली होती. मात्र, या दोघांनाही बाजुला ठेवून हायकमांडने माजी विधानपरिषद सदस्य अश्वथनारायण यांना तिकीट दिले. या दोघांनीही मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केले.

बेंगळूर दक्षिणमध्ये भाजपच्या तेजस्वी सूर्या यांची लढत काँग्रेसचे प्रभावी नेते बी. के. हरिप्रसाद यांच्याशी होणार आहे. तर बेंगळूर ग्रामीणमध्ये अश्वथ नारायण यांची लढत काँग्रेसचे विद्यमान खासदार डी. के. सुरेश यांच्याशी होणार आहे.

28 वर्षाच्या कार्यकर्त्याला तिकीट

बेंगळूरच्या बसवणगुडीचे भाजप आमदार रवी सुब्रह्मण्य यांचा पुतणा तेजस्वी सूर्या रा. स्व. संघाचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. मागील लोकसभा निवडणुकीत नमो ब्रिगेडच्या माध्यमातून त्यांनी भाजप हायकमांडवर आपली छाप उमटवली. उत्तम भाषण कौशल्य अवगत असल्याने युवा कार्यकर्त्यांमध्ये ते लोकप्रिय आहेत. देशप्रेम आणि हिंदुत्वाचे प्रचारक असल्याकारणाने वयाच्या 28 व्या वर्षी लोकसभेसाठी तिकीट मिळविण्यात ते यशस्वी ठरले आहेत.