|Tuesday, June 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » नद्या, विहिरी कोरडय़ा पडतात त्याच वेळी पाण्याची खरी किंमत माणसाला कळते

नद्या, विहिरी कोरडय़ा पडतात त्याच वेळी पाण्याची खरी किंमत माणसाला कळते 

प्रतिनिधी/ कुरूंदवाड

पाणी हे जीवन असून पाण्याचा समतोल दिवसेंदिवस ढासळू लागला आहे. पाण्याचे दुर्भिक्ष निसर्गाच्या अवकृपेमुळे निर्माण झाले नसून आजवरच्या चुकीच्या नियोजन व धोरणामुळे झाले आहे. नद्या, विहिरी कोरडय़ा पडतात त्याच वेळी पाण्याची खरी किंमत माणसाला कळते, त्यासाठी माणसांनी पाण्याचे नियोजन करून ते काटकसरीने वापरावे, असे आवाहन राष्ट्रीय कमांडिंग ऑफिसर बाबासाहेब भूजुगडे यांनी केले.

56 महाराष्ट्र बटालियन एनसीसी भवन कोल्हापूर यांच्यावतीने राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांसाठी जल साक्षरता दिन व चित्रकला स्पर्धांचे आयोजन येथील सहकार भूषण एस. के. पाटील महाविद्यालयात केले होते. त्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी छात्रसेनेचे लेफ्टनंट ऑफिसर डॉ. ए. डी. जाधव होते.

भूजुगडे म्हणाले, दिवसेंदिवस वाढणारे औद्योगीकरण व गावागावातून वाढणारे प्रदूषण यामुळे नद्यांची गटारे बनली आहेत. आपल्या जीवनदायिनी नद्या आता मरणदाईने बनू लागल्या आहेत. त्यामुळे प्रदूषित पाण्यामुळे जलचर प्राणी, पशु, पक्षी यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मानवासाठी यातून मार्ग काढण्यासाठी अनेक कंपन्यांचे बाटलीबंद पाणी विकण्याचे आता पेव फुटले आहे. पाणी हा निसर्गाने दिलेला अमूल्य ठेवा आहे तो प्रत्येकाने जपून वापरला पाहिजे हे सर्वांचे कर्तव्य आहे.

लेफ्टनंट ऑफिसर डॉ. ए. डी. जाधव म्हणाले, जलसाक्षरता दिन ही परंपरा फार जुनी आहे. पाण्याचा काटकसरीने वापर करणे व पाणी शुद्ध ठेवण्यासाठी ऋषीमुनींनी ही समाजाला मार्गदर्शन केले होते. जगातील प्रत्येक देशाला पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. सजीवांना पाण्यावाचून जगता येत नाही. आजच्या काळात पाणी हा घटक माणसामाणसात वर राष्ट्राराष्ट्रांत संघर्ष करणारा घटक ठरत आहे. जलसाक्षरता ही व्यापक संकल्पना आहे. पाण्याबाबत जागृती निर्माण करणे म्हणजेच जलसाक्षरता होय. पाण्याचा वापर उचित न करणे वेगाने वाढणारी लोकसंख्या, औद्योगिकीकरण पाण्याचा पुनर्वापर न करणे पाणी वापराचे नियोजन नसणे, पाणी न अडवणे, पाणी प्रदूषणाला हातभार लावणे असे अनेक बाबींमुळे पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. पाण्याला अद्याप पर्याय नाही याची जाणीव ठेवून सर्वांनी पाण्याची काटकसर करणे गरजेचे आहे.

सरस्वती पूजन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. पाहुण्यांचा सत्कार उदय पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. एस. के. पाटील महाविद्यालय श्रीदत्त कनिष्ठ महाविद्यालय, एस. पी. हायस्कूल कुरुंदवाड, छत्रपती शिवाजी हायस्कूल टाकळी, पद्माराजे विद्यालय शिरोळ, नांदणी हायस्कूल नांदणी, झेले हायस्कूल, मालू हायस्कूल, जयसिंगपूर हायस्कूल मधील 350 राष्ट्रीय छात्र सेनेचे छात्र सहभागी झाले होते. सूत्रसंचालन एनसीसी ऑफिसर पुजारी यांनी तर आभार कमांडिंग ऑफिसर थोरात यांनी मानले.