|Tuesday, June 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » पेठ वडगांव नाही तर ‘पेठ वडगाव’ लिहा

पेठ वडगांव नाही तर ‘पेठ वडगाव’ लिहा 

यादव महाविद्यालयाच्या मराठी विभागाचे आवाहन

प्रतिनिधी/पेठवडगाव

पेठ वडगाव येथील श्री. विजयसिंह यादव कला व विज्ञान महाविद्यालयाच्या मराठी विभागातील विद्यार्थी व डा.प्रशांत गायकवाड आणि रामचंद्र ढवळे यांचेवतीने ‘प्रमाण लेखन विषयक नियम जनजागृती शोध प्रकल्प’ राबविण्यात आला. याचाच एक भाग म्हणून ‘पेठ वडगांव’ नाही तर ‘पेठ वडगाव’ लिहावे असे आवाहन करून वडगाव शहरामध्ये जनजागृती करण्यात आली.

पेठ वडगाव या गावाला सुमारे 150 वर्षांपेक्षा अधिक जुनी परंपरा व मोठा इतिहास आहे. स्पष्टोच्चारित अनुनासिकाबद्दल शीर्षबिंदू (अनुसार) द्यावा. अशा स्वरूपाचा प्रमाणलेखन विषयक नियम 1962 साली झालेला असताना सुमारे 57 वर्षांपासून पेठ वडगाव या शब्दातील ‘गा’ च्या वर्णावर कळत नकळतपणे चुकीच्या पध्दतीने अनुसार दिला जातो. गावांच्या नावाचा उच्चार करताना अनुस्वार नसेल, तर तो देऊ नये, असे स्पष्ट नियम आहेत.

या बाबत यादव महाविद्यालयाच्या मराठी विभागातील विद्यार्थी व प्राध्यापक यांनी ‘प्रमाण लेखन विषयक नियम जनजागृती शोध प्रकल्प’ राबविला. याचा एक भाग म्हणून ‘पेठ वडगांव’ नाही तर ‘पेठ वडगाव’ लिहावे असे आवाहन करून वडगाव शहरामध्ये जनजागृती करण्यात आली. प्रमाण लेखन विषयक नियम, लेखनकोश, ऐतिहासिक कागदपत्रे यांचा अभ्यास करून हा संशोधन प्रकल्प हाती घेणेत आला. पेठ वडगाव नगरपालिका, प्राथमिक आरोग्य केंद्र, पोलीस स्टेशन, पोस्ट ऑफीस, एस. टी. महामंडळ कार्यालय, एम.एस.ई.बी. कार्यालय, तलाठी कार्यालय, सेतू सुविधा केंद्र अशा पेठ वडगाव मधील विविध कार्यालयात विभागाच्यावतीने निवेदने देण्यात आली. याबाबत त्याला सर्वांनीच अनुकूल प्रतिसाद देत विद्यार्थ्यांना सहकार्याचा हात दिला.

यावेळी प्रा. डॉ. प्रशांत गायकवाड म्हणाले, ‘पेठ वडगाव हा शब्द वेगवेगळा  लिहावा की एकच लिहावा याविषयी देखील मोठा संभ्रम आहे. ‘वडगाव’ या नावाची अनेक गावे आहेत, ती स्वतंत्रपणे ओळखण्यासाठी त्या त्या गावाच्या वैशिष्टय़ांवरून विशेषण लावण्याची प्रथा आहे. त्यामूळे ते लिहिताना वडगाव या नावाच्या गावाला जोडून न लिहिता पेठ वडगाव असे स्वतंत्र लिहावे. गावाच्या संस्कृती विषयी प्रेम व्यक्त करताना भाषिक सजगता बाळगूया, मनातील आदर प्रकट करण्यासाठी अधिकृत नावच प्रचलित करूया’ असे जाहीर आवाहन देखील यावेळी करण्यात आले.

प्रा. डॉ. प्रशांत गायकवाड व प्रा.रामचंद्र ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवानी खोत, अंकिता मिरजे, भाग्यश्री चव्हाण, आकांक्षा जाधव, शिवराज जामदार, अमित कोळी, शितल जासूद, प्राजक्ता पाटील, वैष्णवी पाटील, सुमेद कांबळे, सुहेल तानेखान, रामा लोले, इरफान मुलाणी यांनी तसेच माजी विद्यार्थिनी जयश्री शिंदे यांनी  परिश्रम पूर्वक प्रकल्प हाती घेतला.

यापूर्वी मराठी विभागाच्यावतीने विद्यार्थ्यांसाठी एक दिवसीय साहित्य संमेलन, काव्यसंमेलन, परिसरातील उखाण्यांचे संकलन करण्यात आले तसेच मराठीतील नामवंत साहित्यिक चंद्रकुमार नलगे, डॉ. सुनिलकुमार लवटे, डा. विश्वनाथ शिंदे, डॉ. रबिंद्र ठाकूर, डॉ. कृष्णा किरवले, आप्पासाहेब खोत, डॉ. आ. ह. साळुंखे, वसंतराव गायकवाड आदी साहित्यिकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. तसेच अनेक उपक्रमांचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

या शोध प्रकल्पासाठी संस्था अध्यक्ष गुलाबराव पोळ, उपाध्यक्षा विजयादेवी यादव, सचिव विद्याताई पोळ, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. विजया चव्हाण यांचे विशेष असे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.