|Tuesday, June 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » हातकणंगलेसाठी खा.शेट्टींची सांगलीत ‘मवाळ’ भूमिका

हातकणंगलेसाठी खा.शेट्टींची सांगलीत ‘मवाळ’ भूमिका 

युवराज निकम/ इस्लामपूर

‘सांगली हायजॅक-मानापमान’ नाटकाने तिसऱया अंकात रहस्यमय वळण घेतले आहे. सांगलीकरांनी गेल्या चार दिवसांपासून इस्लामपुरकरांच्या (आ.जयंत पाटील) नावाने बोटं मोडली. हा लोकसभा मतदार संघ काँग्रेसकडून काढून घेण्याच्या नाटयमय घडामोडीत आ.पाटील यांचा सहभाग किती या पेक्षा प्रतिक व विशाल पाटील यांच्या नकारघंटेनेच हे नाटक उभे राहिल्याचे पुढे येत आहे. खा.राजू शेट्टी यांनी हातकणंगलेतील उपद्रव कमी करण्यासाठी आणि दादा घराण्याशी संबंध यामुळे सांगलीत मवाळ भूमिका घेतल्याने विशाल पाटील यांचा मार्ग मोकळा झाल्याची चर्चा आहे. या घडामोडीत मात्र येथून इच्छुक असणारे वाळवा-इस्लामपुरकर दिलीपराव पाटील यांचे नाव आता मागे पडण्याची शक्यता आहे.

    सांगली लेकसभा मतदार संघ पुर्वीपासून काँग्रेसकडे आहे. येथे वसंतदादा पाटील घराण्याचे वर्चस्व राहिले आहे. त्यामुळे येथील उमेदवारीसह मतदार संघ अदला-बदलीचे निर्णय काँग्रेस श्रेष्ठी हेच घेणार. पण यावेळी भाजप-शिवसेनेला शह देण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने अनेक घटक पक्षांना सामावून घेतले. यामध्ये खा.राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचाही समावेश आहे. या जागा वाटपात सांगली स्वाभिमानीला देण्याच्या चर्चेचे वादळ सांगलीपर्यंत येवून धडकताच सांगलीचे पाटील खडबडून जागे झाले. त्यापुर्वी त्यांनी उमेदवारीची नकारघंटा वाजवल्यामुळेच हे नाटक निर्माण झाले. सांगली पळवली… सांगली पळवली…, असा कांगावा करीत त्यांनी आ.पाटील यांना टार्गेट केले. दबाव मेळाव्यात ही त्यांच्यावर तोंडसुख घेण्यात आले.

   हे नाटक मुळी उभे कसे राहिले, याचा अभ्यास न करता आरोप-प्रत्यारोप सुरु राहिल्याने गोंधळ निर्माण झाला. मेळाव्याच्या दुसऱया अंकात काही वाळव्यातील वसंतदादा प्रेमी सहभागी झाल्याने जयंतरावांवर अधिकच निशाणा साधण्यात आला. या नाटयमय घडामोडीत आ.विश्वजीत कदम, ज्यांच्यासाठी हा मतदार संघ सोडण्याचा निर्णय काँग्रेस श्रेष्ठींनी घेतला, ते खा.शेट्टी हे प्रक्षेकाच्या भुमिकेत राहिले. मेळाव्यात उमेदवारी नाकारुन चुक केल्याचे कबुल करतानाही सांगलीकर पाटील यांनी जयंतरावांसह इतरांना दुषणे देण्याचे बंद केले नाही. परिणामी लवचिक होवून सांगलीत दादा घराणे व काँग्रेसचे अस्तित्व †िटकवण्यासाठी अटापिटा सुरु झाला आहे.

    सांगली लेकसभा मतदार संघ आणि हातकणंगले मतदार संघ यांचे काही प्रमाणात कनेक्शन आहे. स्वाभिमानीला सांगली सोडण्याचा निर्णय झाल्यानंतर गोंधळ निर्माण झाल्याने खा.शेट्टी हे देखील हडबडून गेले. दादा घराणे आणि आपले संबंध चांगले असल्याचे सांगतानाच त्यांनी वादग्रस्त जागा आपणास नको, अशी भूमिका घेवून आणखी एका जागेचा आग्रह धरला आहे. सोमवारी रात्री सांगलीचे पाटील आणि खा.शेट्टी यांची गुप्त बैठक झाली आहे. यामध्ये शेट्टी यांनी ‘मवाळ’भूमिका घेत विशाल पाटील यांच्या उमेदवारीला सिग्नल दिला आहे. हातकणंगले लोकसभा मतदार संघात वसंतदादा गटाचा उपद्रव होवू नये, हाच त्या पाठीमागील कावा आहे.

  सुरुवातीपासून सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष दिलीपराव पाटील सांगलीतून लढण्यास तयार आहेत. हा मतदार संघ स्वाभिमानीकडे बिनवादाचा राहिला असता, तर दिलीपतात्यांची उमेदवारी निश्चित होती. पण सोमवारी रात्री चर्चा, बैठका यातून येथील राजकीय समिकरणांनी वेगळे वळण घेतले आहे. ना-हो करीत विशाल पाटील यांनी मैदानात उतरण्याची तयारी केल्याने दिलीपतात्यांची उमेदवारी दूर गेली. स्वतःच्या काँग्रेस व मित्र पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांवर चिखलफेक करीत विशाल हे मैदानात उतरत आहेत. त्यांनी विश्वजित यांना ‘झारीतील शुक्राचार्य’ संबोधले नसल्याचे म्हटले आहे, निवडणूक व प्रचार संपेपर्यंत  ज्यांच्यावर निशाणा साधला असेल, त्यांनाही खुलासा करावा लागण्याची शक्यता आहे. गेले आठवडाभर कितीही नाटक रंगले असले, तरी निवडणुक काळात सारे एकत्र येणार आहेत. पण रंगलेल्या ‘सांगली हायजॅक-मानापमान’ नाटकानंतर उभारी धरुन भाजपाचे कसलेले मल्ल संजयकाका पाटील यांच्याशी लढत द्यावी लागणार आहे.