|Monday, June 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » पीक विमा रक्कम सक्तीने कर्जाला वसुली करू नये : जिल्हधिकारी

पीक विमा रक्कम सक्तीने कर्जाला वसुली करू नये : जिल्हधिकारी 

प्रतिनिधी/ सांगली

बँकांनी पीक विमापोटी आलेली रक्कम कर्जखात्याला सक्तीने वळती करू नये असे आदेश जिल्हधिकारी डॉ अभिजित चौधरी यांनी अधिकाऱयांना आढावा बैठकीत दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या जिल्हास्तरीय आढावा बैठकीत ते बोलत होते. या आढावा बैठकीमध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना आणि सुधारीत हवामान आधारीत फळपीक विमा योजना विषयक सर्वंकष आढावा घेण्यात आला. शासनामार्फत जिह्यामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत पीक विमा व पुनर्रचित हवामान आधारीत फळपीक विमा या योजनांची अंमलबजावणी करण्यात येते. या योजनांच्या माध्यमातून पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱयांच्या पिकांचे अपुरा पाऊस, इत्यादी नैसर्गिक आपत्ती पासून नुकसान झाल्यास, संबंधित विमा कंपनीकडून विमा दाव्याची रक्कम पात्र शेतकऱयांच्या खात्यावर थेट जमा करण्यात येते. सहभागी पात्र शेतकयांच्या बचत खात्यावर विमा कंपनीकडून जमा करण्यात आलेल्या पीक विम्याच्या रकमेतून संबंधित बँकांनी सक्तीने कर्ज वसुली करू नये, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.

सद्यस्थितीत जिह्यामध्ये पुनर्रचित हवामान आधारीत फळपीक विमा योजना, मृग बहार सन 2018-19 मध्ये योजनेंतर्गत सहभागी झालेल्या पात्र शेतकऱयांची विमा दाव्याची रक्कम टाटा एआयजी जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, पुणे मार्फत जमा करण्याची कार्यवाही सुरू आहे. तसेच खरीप हंगाम 2018-19 मधील प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत सहभागी झालेल्या पात्र शेतकऱयांची विमा दाव्याची रक्कम ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीमार्फत अदा करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.

 सध्या दुष्काळी परिस्थिती असल्याने शेतकरी अडचणीत आहे अशा वेळी शेतकऱयांना दिलासा देणे महत्वाचे आहे. शासनानेही दुष्काळी सवलती जाहीर केल्या आहेत. त्यानुसार बँकांना पीक विम्यासह कोणतीही वसुली सक्तीने करता येणार नाही त्यामुळे बँकांनी सक्तीने कर्ज वसुली करू नये असेही निर्देश यावेळी जिल्हधिकारी डॉ अभिजित चौधरी यांनी दिले.