|Thursday, August 22, 2019
You are here: Home » क्रिडा » करन म्हणतो, हॅट्ट्रिकची कल्पनाच नव्हती!

करन म्हणतो, हॅट्ट्रिकची कल्पनाच नव्हती! 

मोहाली / वृत्तसंस्था

आयपीएल क्रिकेट लीगमध्ये हॅट्ट्रिक साजरी करणारा किंग्स इलेव्हन पंजाबचा अष्टपैलू सॅम करन सर्वात युवा खेळाडू ठरला असला तरी आपल्याला हॅट्ट्रिकची अजिबात कल्पना नव्हती, असे त्याने या लढतीनंतर नमूद केले. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध डावातील 18 व्या षटकात शेवटच्या चेंडूवर एक फलंदाज बाद केल्यानंतर त्याने 20 षटकातील पहिल्या दोन्ही चेंडूवर आणखी दोन बळी घेत त्याने हॅट्ट्रिक साजरी केली. पण, आपली हॅट्ट्रिक झाल्याचे त्याला उशिरानेच ध्यानात आले. त्याच्या या भेदक गोलंदाजीमुळे किंग्स इलेव्हन पंजाबने 14 धावांनी रोमांचक विजय संपादन केला.

मूळ नॉर्थम्प्टनचा असलेला 20 वर्षीय सॅम करन या हंगामात किंग्स इलेव्हन पंजाबचा सर्वात महागडा खेळाडू ठरला. त्याच्यासाठी पंजाबने 7.20 कोटी रुपयांची किंमत मोजली. आता ते सार्थ ठरवत सॅम करन आयपीएलमध्ये हॅट्ट्रिक नोंदवणारा सर्वात युवा खेळाडूही ठरला आहे.

हॅट्ट्रिक साकारणाऱया करनने सामन्यात 11 धावात 4 बळी असे भेदक पृथक्करण नोंदवले व अर्थातच तो सामनावीर पुरस्काराचा मानकरीही ठरला. या भेदक गोलंदाजीमुळे दिल्ली कॅपिटल्सचा संघ 3 बाद 144 वरुन सर्वबाद 152 धावांमध्ये गडगडला. या लढतीत दिल्लीसमोर 167 धावांचे आव्हान होते.

स्वतः करनला मात्र तिसरा बळी घेण्यापूर्वी आपल्याला हॅट्ट्रिकची संधी आहे, याची कल्पनाच नव्हती. ‘आम्ही सामना जिंकला आणि एका सहकाऱयाने मला तुझी हॅट्ट्रिक झाली आहे, असे सांगितले, त्यावेळी त्यावर माझा विश्वासच बसला नाही’, असे तो म्हणाला.

सॅमला कुटुंबात क्रिकेटची बरीच पार्श्वभूमी लाभली आहे. त्याचे वडील दिवंगत केव्हिन करन झिम्बाब्वे संघातर्फे अष्टपैलू खेळाडू या नात्याने खेळले तर त्याचा भाऊ टॉम करन हा देखील इंग्लिश संघातून खेळत आला आहे. मंगळवारी ख्रिस गेल पाठदुखीमुळे बाहेर फेकला गेल्यानंतर सॅम करनला संघात स्थान लाभले आणि हॅट्ट्रिक साजरे करत त्याने या संधीचे खऱया अर्थाने सोने केले. सॅमने तत्पूर्वी फलंदाजीतही सलामीला उतरत 10 चेंडूत जलद 20 धावा फटकावल्या.

सॅम करनने इंग्लंडतर्फे 9 कसोटी सामने खेळले असून फलंदाजीत त्याची सरासरी 32 इतकी राहिली असून त्याच्या खात्यात 15 बळी आहेत. 17 व्या वर्षी त्याने सरेतर्फे प्रथमश्रेणी पदार्पण केले. इतक्या कमी वयात प्रथमश्रेणी पदार्पण करणारा तो टोनी लॉकनंतर दुसराच सर्वात तरुण खेळाडू ठरला.

गोलंदाजीत त्याची हॅट्ट्रिक 18 व्या षटकात सुरु झाली. या षटकातील शेवटच्या चेंडूवर त्याने हर्षल पटेलला बाद केले. त्यानंतर 20 व्या षटकातील पहिल्या दोन चेंडूवर अनुक्रमे कॅगिसो रबाडा व संदीप लमिचने यांना बाद करत त्याने हॅट्ट्रिक कमावली. पाहुण्या संघाला 3 गडी बाकी असताना 21 चेंडूत केवळ 23 धावांची आवश्यकता होती. पण, करनने तीन फलंदाज ओळीने बाद करत दिल्लीच्या संघर्षाला पूर्णविराम दिला.

यापूर्वी चक्क रोहित शर्मा हा आयपीएल हॅट्ट्रिक घेणारा सर्वात तरुण खेळाडू होता. शर्माने 22 व्या वर्षी 2009 मध्ये डेक्कन चार्जर्सतर्फे मुंबई इंडियन्सविरुद्ध हॅट्ट्रिक साजरी केली होती. करनप्रमाणेच रोहितची हॅट्ट्रिक देखील त्यावेळी दोन षटकात विभागली गेली. अभिषेक नायर, हरभजन सिंग यांना 16 व्या षटकातील शेवटच्या दोन चेंडूंवर तर 18 व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर जेपी डय़ुमिनीला बाद करत तो हॅट्ट्रिकवीर ठरला होता.