|Monday, August 26, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » निवडणूक आयोगाचा ‘प्राप्तिकर’ला दणका

निवडणूक आयोगाचा ‘प्राप्तिकर’ला दणका 

नवी दिल्ली :

बेकायदा आणि अवाजवी संपत्ती गोळा केल्याप्रकरणी सध्या प्राप्तिकर विभागाकडून देशात विविध ठिकाणी छापासत्र सुरू आहे. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता काळातच ही कारवाई सुरू असल्याने केंद्रीय निवडणूक आयोगाने संताप व्यक्त केला आहे. त्या अनुषंगाने केंद्रीय निवडणूक आयोगाने प्राप्तिकर विभागाला धारेवर धरत छापा टाकण्याआधी आम्हाला पूर्वकल्पना द्यावी, तंबी दिली आहे.

कर्नाटक, मध्य प्रदेश आणि दिल्लीमध्ये नुकत्याच करण्यात आलेल्या छापेमारीमुळे सध्या राजकीय वातावरण तापले आहे. त्यातच आता निवडणूक आयोगाने संताप व्यक्त करत प्राप्तिकर विभागाला चांगलेच खडसावले आहे. निवडणूक आयोगाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशात प्राप्तिकर विभागाने केलेल्या छापेमारीची निवडणूक आयोगाला कोणतीच माहिती नव्हती. केंद्रीय निवडणूक आयोगाबरोबरच राज्य निवडणूक अधिकाऱयांनाही याबद्दल कोणतीच सूचना देण्यात आली नसल्याने निवडणूक आयोगाने प्राप्तिकर विभागाला यासंबंधी विचारणा केली आहे. आचारसंहिता लागू असल्याने भ्रष्टाचाराशी संबंधित कोणतीही छापेमारी किंवा कारवाई करताना निवडणूक आयोग किंवा राज्य निवडणूक अधिकाऱयांना यासंबंधी माहिती देण्यात यावी, असे बजावले.