|Monday, August 26, 2019
You are here: Home » क्रिडा » तांत्रिक संचालकपदासाठी चार जणांची यादी जाहीर

तांत्रिक संचालकपदासाठी चार जणांची यादी जाहीर 

प्रमुख फुटबॉल प्रशिक्षक निवडीवेळीच या पदाचीही निवड होणार

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनने तांत्रिक संचालक नियुक्त करण्याचे निश्चित केले असून गेल्या दोन वर्षापासून रिक्त असलेल्या या पदासाठी त्यांनी चार जणांची यादी तयार केली आहे.

राष्ट्रीय फुटबॉल संघासाठी प्रमुख प्रशिक्षक निवडण्याची प्रक्रियाही सुरू असून या निवडीवेळीच तांत्रिक संचालकाचीही निवड केली जाणार आहे. या पदासाठी निवडलेल्या चार जणांत ऑस्ट्रेलियाचे स्कॉट ओडोनेल, जॉर्जियाचे गायोझ दारसाडेझ, रोमानियाचे दोरु इसाक व पोर्तुगालचे जॉर्ज कॅस्टेलो यांचा समावेश आहे. ओडोनेल यांनी याआधीही या पदावर काम पाहिलेले आहे. या निवडीसंदर्भात एआयएफएफच्या तांत्रिक समितीला 15 एप्रिल रोजी बैठकीसाठी फेडरेशनने बोलावले असून माजी खेळाडू श्याम थापा हे या समितीचे अध्यक्ष आहेत.

‘राष्ट्रीय संघासाठी मुख्य प्रशिक्षक नेमण्यावर सर्व लक्ष केद्रित होणार असले तरी एआयएफएफ तांत्रिक संचालकाचीही निवड करणार आहे. प्रशिक्षक निवडीवेळीच त्याचीही घोषणा करण्यात येईल,’ असे एआयएफएफमधील एका सूत्राने सोंगितले.  ‘पुढील सोमवारी तांत्रिक समितीची बैठक होणार असून संचालक व राष्ट्रीय प्रशिक्षक नियुक्ती संदर्भात ते बोलणी करतील,’ असेही या सूत्राने सांगितले. थापा यांनी 15 एप्रिल रोजी बैठक होणार असल्याचे स्पष्ट केले. 2017 मध्ये ओडोनेल यांनी तांत्रिक संचालकपदाचा राजीनामा दिल्यानंतर भारताचे माजी खेळाडू व प्रशिक्षक साविओ मेदीरा यांच्याकडे हंगामी संचालकपद सोपविण्यात आले. सध्या तेच या पदाचे काम पाहत आहेत. ओडोनेल यांनी एआयएफएफसमवेत पाच वर्षे  काम केले आहे. मात्र त्यापैकी फक्त एक वर्षच ते तांत्रिक संचालकपदी होते. 2015 मध्ये त्यांनी हे पद हॉलंडच्या रॉब बान यांच्याकडून स्वीकारले होते. त्यामुळे भारतीयांना ते चांगले परिचित झाले आहेत.