|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » क्रिडा » संघनिवडीच्या उंबरठय़ावरच रोहित शर्माला दुखापत

संघनिवडीच्या उंबरठय़ावरच रोहित शर्माला दुखापत 

11 वर्षात प्रथमच आयपीएल सामन्यातून बाहेर, राष्ट्रीय निवड समितीवर चिंतेची छटा

मुंबई / वृत्तसंस्था

आयसीसी विश्वचषक स्पर्धेसाठी संघनिवड अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपलेली असताना भारतीय उपकर्णधार व आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स प्रँन्चायझीचा कर्णधार रोहित शर्माला दुखापतीला सामोरे जावे लागले. रोहितला उजव्या पायाच्या स्नायूंना वेदना जाणवल्या आणि यामुळे तो बुधवारी किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्धच्या लढतीत खेळू शकला नाही. आयपीएलमध्ये खेळलेल्या 11 आवृत्त्यांमध्ये रोहितसाठी दुखापतीने एखादी लढत हुकण्याची ही पहिलीच वेळ ठरली. दरम्यान, त्याची ही दुखापत राष्ट्रीय निवड समितीसाठी चिंतेची ठरु नये, अशी भारतीय क्रिकेट वर्तुळाची अपेक्षा आहे.

‘रोहित शर्माला मंगळवारी सराव सत्रादरम्यान उजव्या पायाला वेदना जाणवल्या. त्यानंतर 24 तासांच्या कालावधीत तो उत्तमरित्या सावरला आहे. पण, खबरदारीची उपाययोजना म्हणून मुंबई इंडियन्स संघव्यवस्थापनाने पंजाबविरुद्ध त्याला न खेळवण्याचा निर्णय घेतला’, अशी माहिती पत्रकातून दिली गेली. रोहितला झालेली दुखापत किंवा वेदना अगदीच किरकोळ असेलही. पण, यामुळे, वर्ल्डकप संघनिवडीच्या पार्श्वभूमीवर ती अधिक चिंतेची मानली जात आहे.

मुंबई इंडियन्स संघाने मागील आठ दिवसात तीन सामने खेळले असून यामुळे त्याच्यावर अधिक ताण येऊ नये, यासाठी भारतीय संघव्यवस्थापन काही सूचना करणार का, हे देखील महत्त्वाचे असेल. भारतीय क्रिकेट संघात कर्णधार विराट कोहलीनंतर रोहित शर्मा हाच दुसऱया क्रमांकाचा महत्त्वाचा फलंदाज असून यामुळे प्रशिक्षक रवी शास्त्री व फिजीओ पॅट्रिक फरहार्ट त्यांच्या तंदुरुस्तीविषयी विशेष जागरुक असणार आहेत. फिजीओ पॅट्रिक फरहार्ट हे मुंबईचे फिजीओ नितीन पटेल यांच्याशी संपर्क साधून मुंबई संघातील अन्य भारतीय खेळाडूंवरील भार कसा कमी करता येईल, याबाबत चर्चा करतील, असे सध्याचे संकेत आहेत.