|Monday, August 26, 2019
You are here: Home » क्रिडा » कोहलीला सलग तिसऱयांदा विस्डेनचा बहुमान

कोहलीला सलग तिसऱयांदा विस्डेनचा बहुमान 

महिलांमध्ये स्मृती मानधनाची तर टी-20 प्रकारांसाठी रशिद खानची निवड

वृत्तसंस्था/ लंडन

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला विस्डेनने सलग तिसऱया वर्षी विश्वातील सर्वोत्तम अव्वल क्रिकेटपटू म्हणून निवड केली आहे. या वर्षीच्या विस्डेनच्या आवृत्तीत त्याची ही निवड केल्याचे नमूद करण्यात आले असल्याचे बुधवारी विस्डेनतर्फे सांगण्यात आले. महिलांमध्ये हा मान स्मृती मानधनाला तर टी-20 मध्ये अफगाणिस्तानच्या रशिद खानची निवड करण्यात आली.

विस्डेने वर्षातील पाच सर्वोत्तम क्रिकेटपटूंचीही निवड केली असून त्यातही 30 वर्षीय कोहलीला स्थान देण्यात आले आहे. इंग्लंडचे जोस बटलर, सॅम करन, कौंटी चॅम्पियनशिप जिंकणाऱया संघाचा कर्णधार रॉरी बर्न्स व इंग्लंड महिला संघातील टॅमी ब्युमाँट हे अन्य चार खेळाडू आहेत.

कोहलीने 2014 च्या इंग्लंड दौऱयात केवळ 134 धावा जमविल्या होत्या. पण गेल्या वर्षी त्याने पाच कसोटींच्या मालिकेत 59 हून अधिक धावांच्या सरासरीने 593 धावा जमविल्या. या कामगिरीमुळे त्याला विस्डेनच्या यादीत स्थान मिळाले आहे. ‘भारतीय संघाने ही मालिका गमविली असली तरी कर्णधार कोहलीने फलंदाजीत चमक दाखवून 2014 मधील संघर्षाला पूर्णविराम दिला. त्याची इंग्लंडमधील कसोटीतील फलंदाजी शानदार राहिली आणि वनडेमध्ये त्याने आपला फॉर्म नव्या उंचीवर नेला होता,’ असे विस्डेनचे संपादक लॉरेन्स बूथ यांनी म्हटले आहे. गेल्या जानेवारीत कोहलीने आयसीसीचा सर्वोत्तम क्रिकेटपटू, कसोटी व वनडे क्रिकेटपटू असे पुरस्कार मिळविले आहेत. त्याने तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये मिळून मागील वर्षी 68.37 च्या सरासरीने 2735 धावा जमविल्या. त्यात 11 शतकांचा समावेश होता.

महिलांमध्ये वर्षातील अव्वल महिला क्रिकेटपटू म्हणून भारताच्या स्मृती मानधनाची निवड केली आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये तिने गेल्या वर्षी 1291 धावा जमविल्या तर अफगाणिस्तानचा स्पिनर रशिद खानला टी-20 क्रिकेटमधील अव्वल क्रिकेटपटूचा बहुमान सलग दुसऱया वर्षी मिळाला.