|Monday, August 26, 2019
You are here: Home » क्रिडा » राजस्थान रॉयल्ससमोर आज बलाढय़ चेन्नईचे आव्हान

राजस्थान रॉयल्ससमोर आज बलाढय़ चेन्नईचे आव्हान 

गुणतालिकेत राजस्थान सातव्या स्थानी,

जयपूर / वृत्तसंस्था

यंदाच्या आयपीएल मोसमात फॉर्मसाठी अद्याप झगडत असलेल्या राजस्थान रॉयल्सविरुद्ध आज (दि. 11) बलाढय़ चेन्नई सुपरकिंग्सचे कडवे आव्हान असेल. राजस्थानला आतापर्यंत खेळलेल्या 5 सामन्यात केवळ एकच विजय संपादन करता आला असून आठ संघांच्या गुणतालिकेत ते सध्या सातव्या स्थानी फेकले गेले आहेत. राजस्थान-चेन्नई लढत आज रात्री 8 पासून खेळवली जाईल. राजस्थानला यंदा आरसीबीविरुद्ध एकमेव विजय मिळवता आला आहे.

राजस्थान अद्याप फॉर्मसाठी झगडतच आहे. मात्र, आजची लढत सवाई मानसिंग स्टेडियमवर होत असून घरच्या चाहत्यांचे पाठबळ राजस्थानला लाभेल. याचा लाभ घेण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. दुसरीकडे, चेन्नईचा संघ मात्र बहारदार फॉर्ममध्ये असून यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्सचा त्यांनी सात गडी राखून फडशा पाडला आहे. सध्या ते 6 सामन्यात 5 विजयांसह अव्वलस्थानी विराजमान आहेत.

महेंद्रसिंग धोनीसारखा अव्वल कर्णधार ही यंदाही चेन्नईची जमेची बाजू ठरत आली असून उत्तम संघबांधणी झाल्याने या संघाने आपल्या घरच्या मैदानात आणि  अन्य प्रँचायझींच्या मैदानावर देखील उत्तम कामगिरी साकारली आहे. राजस्थानला मात्र त्या तुलनेत अजिबात सूर सापडलेला नाही. घरच्या मैदानावरच झालेल्या केकेआरविरुद्धच्या लढतीत ते सपशेल आदळले होते.

या हंगामातील पहिलेवहिले शतक झळकावणारा धडाकेबाज फलंदाज संजू सॅमसन अद्याप दुखापतीतून सावरत असून विस्फोटक फलंदाजीची क्षमता असलेला जोस बटलर देखील मागील काही डावात अपयशी ठरला आहे. माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह स्मिथ बहरात परतला असल्याने ही राजस्थानसाठी एकमेव स्वागतार्ह बाजू ठरली आहे. स्मिथने आरसीबीविरुद्ध 38 धावा जमवण्यापूर्वी केकेआरविरुद्ध नाबाद 73 धावांची शानदार खेळी साकारली होती. केकेआरविरुद्ध स्मिथच्या खेळीमुळे राजस्थानला 139 धावांपर्यंत मजल मारता आली होती.

संभाव्य संघ

राजस्थान रॉयल्स : अजिंक्य रहाणे (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ, बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर, जोस बटलर, ऍस्टॉन टर्नर, ईश सोधी, ओशेन थॉमस, लियाम लिव्हिंगस्टोन, संजू सॅमसन, शुभम रांजणे, स्टुअर्ट बिन्नी, श्रेयस गोपाल, सुदेशन मिधुन, जयदेव उनादकट, प्रशांत चोप्रा, महिपाल लोमरोर, आर्यमन बिर्ला, रियान पराग, धवल कुलकर्णी, कृष्णप्पा गौतम, वरुण ऍरॉन, शशांक सिंग, मनन वोहरा, राहुल त्रिपाठी.

चेन्नई सुपरकिंग्स : महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक-कर्णधार), सुरेश रैना, अम्बाती रायुडू, शेन वॅटसन, फॅफ डय़ू प्लेसिस, मुरली विजय, केदार जाधव, सॅम बिलिंग्ज, रविंद्र जडेजा, ध्रुव शोरे, चैतन्य बिश्नोई, ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन ब्रेव्हो, कर्ण शर्मा, इम्रान ताहीर, हरभजन सिंग, मिशेल सॅन्टनर, शार्दुल ठाकुर, मोहित शर्मा, केएम असिफ, दीपक चहर, एन. जगदीशन, स्कॉट कगलेईन.

सामन्याची वेळ : रात्री 8 पासून.