|Monday, August 26, 2019
You are here: Home » क्रिडा » भारताचा मलेशियावर 1-0 ने विजय

भारताचा मलेशियावर 1-0 ने विजय 

महिलांची हॉकी मालिका : लालरेमसियामीचा एकमेव गोल, भारताची मालिकेत 3-0 ने आघाडी

वृत्तसंस्था/ क्वालालम्पूर

येथे सुरु असलेल्या महिलांच्या पाच सामन्यांच्या हॉकी मालिकेतील चौथ्या सामन्यात भारतीय महिलांनी मलेशियाचा 1-0 ने पराभव केला. या विजयासह भारताने मालिकेत 3-0 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेतील तिसरा सामना बरोबरीत संपला होता. भारताकडून लालरेमसियामीने एकमेव गोल करत विजयात मोलाची भूमिका बजावली. आता, उभय संघातील पाचवा व शेवटचा सामना दि. 11 रोजी होईल.

मलेशिया दौऱयावर आलेल्या भारतीय महिला हॉकी संघाचा खेळ चारही सामन्यात दर्जेदार झाला. बुधवारी झालेल्या चौथ्या सामन्यातही भारतीय महिला खेळाडूंनी शानदार प्रदर्शन केले खरे पण मोठय़ा फरकाने त्यांना विजय मिळवता आला नाही. प्रारंभापासून दोन्ही संघातील खेळाडूंनी सावध खेळण्यावर भर दिल्याने मध्यंतरापर्यंत 0-0 अशी स्थिती होती. मध्यंतरानंतर मलेशियन संघाला दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले पण भारतीय गोलरक्षकाच्या अभेद्य बचावामुळे त्यांना गोल नोंदवता आला नाही. यानंतर, तिसऱया सत्राच्या अखेरपर्यंतही पाटी 0-0 अशी बरोबरीत राहिली होती. चौथ्या सत्रात मात्र भारतीय महिलांनी  मलेशियावर चांगलेच वर्चस्व राखले. 55 व्या मिनिटाला लालरेमसियामीने पेनल्टी कॉर्नरवर शानदार गोल करत भारताला 1-0 अशी आघाडी घेऊन दिली. यानंतर, शेवटपर्यंत मलेशियाने बरोबरी साधण्यासाठी प्रयत्न केले पण त्यांना गोल नोंदवता आला नाही. अखेरीस भारताने हा सामना 1-0 असा जिंकत थाटात विजयावर शिक्कामोर्तब केले.