|Thursday, June 27, 2019
You are here: Home » Top News » राज्याच्या काही भागांत अवकाळी पाऊस

राज्याच्या काही भागांत अवकाळी पाऊस 

 

 पुणे/ प्रतिनिधी :  पुणे, पिंपरी-चिंचवड, साताऱयासह मध्य महाराष्ट्राच्या काही भागात शनिवारी हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला. तर कोकण व उत्तर महाराष्ट्राच्या काही भागांतही पावसाची नोंद झाली. या पावसाने उकाडय़ाने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. येत्या 24 तासांत गोव्यासह संपूर्ण महाराष्ट्रात तुरळक स्वरूपाचा, तर पुढच्या तीन ते चार दिवसांत विदर्भ, मराठवाडा, कोकण, मध्य महाराष्ट्रासह राज्याच्या काही भागात हलक्या स्वरूपाचा तसेच काही ठिकाणी सोसाटय़ाचा वारा व मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.

मागच्या काही दिवसांपासून राज्याच्या अनेक भागांतील तापमानात मोठी वाढ झाली आहे. विदर्भ, मराठवाडय़ासह राज्याच्या विविध भागांतील तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे पोहोचले आहे. घामाच्या धारांनी व उन्हाच्या काहिलीने नागरिक हैराण झालेले असताना अनेक भागांत शनिवारी पावसाची नोंद झाली. तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण झाले. पावसाच्या या शिडकाव्याने मात्र नागरिकांना दिलासा मिळाला. पुणे व पिंपरी चिंचवड परिसरात दुपारी साडेतीनपासून ढगाळ वातावरण होते. त्यानंतर सायंकाळी साडेसहा पावणे सातच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह व वादळी वाऱयासह पावसाला सुरुवात झाली. ऐन उन्हाळय़ातील या पहिल्यावहिल्या पावसाने अनेकांची त्रेधा तिरपिट उडाली. पुण्याबरोबरच नाशिकमधील मनमाड, साताऱयातील वाई, महाबळेश्वर, रत्नागिरी येथेही पावसाची नोंद झाली. या पावसामुळे कांदा व आंबा पिकाचे नुकसान झाल्याने बळीराजाच्या चिंतेत वाढ झाली आहे.

गारांचा पाऊस पडणार

रविवारी गोव्यासह संपूर्ण महाराष्ट्रात तुरळक पावसाचा अंदाज आहे. तर सोमवारी, मंगळवारी व बुधवारीही मराठवाडा, विदर्भ, कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी सोसाटय़ाचा वारा, विजांच्या कडकडाटासह गारांचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.

राज्यात तापमान चाळीशी

दुसरीकडे राज्याच्या अनेक शहरांतील कमाल तापमान 40 अंशांवर पोहोचल्याचे दिसत आहे. शनिवारी ब्रम्हपुरी येथे सर्वाधिक 44.2 अंश इतके तापमान नेंदविण्यात आले. अन्य शहरांतील तापमान पुढीलप्रमाणे ः पुणे 40.9, नगर 43.4, जळगाव 43, कोल्हापूर 38.6, महाबळेश्वर 35.4, मालेगाव 42, नाशिक 39.7, सांगली 40, सातारा 39.2, सोलापूर 42.6, मुंबई 33.2, अलिबाग 33.4, रत्नागिरी 34, डहाणू 35.1, उस्मानाबाद 41.6, औरंगाबाद 41.3, परभणी 43.6, नांदेड 43, बीड 43.1, अकोला, अमरावती 44, बुलढाणा 41.1, चंद्रपूर 44.2, गोंदिया 40.8, नागपूर 43.3, वाशिम 42.2, वर्धा 44.2, यवतमाळ 42.8