|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » जिल्हय़ात गारांसह वादळी पाऊस

जिल्हय़ात गारांसह वादळी पाऊस 

प्रतिनिधी/ रत्नागिरी

संपूर्ण जिल्हाभरातील नागरिक प्रचंड उष्म्याने हैराण झालेले असताना शनिवारी सायंकाळी अचानक विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट आणि सोसाटय़ाच्या वाऱयासह आलेल्या अवकाळी पावसाने साऱयांचीच त्रेधातिरपीट उडाली. त्यात संगमेश्वर, राजापूर तालुक्यात गारा पडल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. रत्नागिरी शहर परिसरात धुळीचे वादळ घोंघावल्याने सर्वत्र धुळीचे लोट उसळले. वातावरणातील बदलाचा फटका मात्र येथील आंबा, काजू बागायतदारांना बसला आहे. अचानक निर्माण झालेल्या या वादळामुळे बागायतदारांनी डोक्याला हात टेकला आहे.   

  रत्नागिरीत शनिवारी सायंकाळी विजांच्या कडकडाटासह पावसाच्या शिडकाव्याने प्रचंड धुळीचे वादळ घोंघावले. सुमारे अर्धा-पाऊणतास चाललेल्या अस्मानी संकटात सारी रत्नागिरी धुळीने व्यापली होती. या वातावरणामुळे नागरिकांची पळापळ उडालीच पण आंबा पिकाचेही मोठे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून वातावरणात मोठे बदल होत आहेत. कधी कमी तापमान तर कधी त्या तापमानाने उच्च पातळी गाठलेली दिसून येते. शनिवारीही सकाळपासूनच वातावरण फार बदललेले दिसले. प्रचंड गर्मी, कडाक्याच्या उन्हामुळे अक्षरशः नागरिकांना ग्रासले. सायंकाळनंतर काळय़ाकुट्ट ढगांनी आभाळ दाटून येत विजांच्या कडकडाटाला प्रारंभ झाला. सुमारे 6 ते 6.30 वाजण्याच्या सुमारास चक्रावात निर्माण झाल्याने सर्वत्र वातावरणात धुळीचे लोट उसळले. त्याबरोबर पावसाचाही अनेक भागात शिडकावा झाला. रत्नागिरी शहर व आजूबाजूच्या ग्रामीण भागातही हे वातावरण दिसले. दरम्यान जिल्हय़ातील रत्नागिरीसह लांजा, राजापूर, संगमेश्वर, गुहागर, चिपळूण येथे पडलेल्या पावसामुळे जनजीवन काही वेळ विस्कळीत झाले होते.       

      व्यापाऱयांसह शेतकरी, बागायतदारांची उडाली तारांबळ

संगमेश्वर: तालुक्यात शनिवारी सकाळी होणाऱया प्रचंड उकाडय़ानंतर सायंकाळी 5 वा.च्या दरम्यान ढगांचा गडगडाट आणि सोसाटय़ाच्या वाऱयासह गारांचा पाऊस पडला. अचानक गारांचा पाऊस सुरु झाल्याने व्यापाऱयांसह शेतकरी व बागायतदारांची तारांबळ उडाली. सायंकाळी 5वा.च्या दरम्यान तालुक्यातील धामणी, संगमेश्वर शहर, निढळेवाडी, ओझरखोल, गोळवली, कसबा आदी भागासह अनेक गावांत सोसाटय़ाचा वारा सुरु झाला तसेच विजांचा गडगडाटही सुरु झाला. त्यानंतर अवघ्या 5 मिनिटात गारांचा पाऊस सुरु झाला. वादळी वाऱयासह गारांचा पाऊस सुरु झाल्याने हवेमध्ये प्रचंड गारवा आला. अनेकांनी गारा साठवूनही आनंद लुटला. बाजारपेठांमध्ये खरेदी करण्यासाठी आलेले ग्राहकवर्ग पावसामुळे मध्येच अडकून बसले. तसेच रस्त्यामध्ये पावसाचे पाणी साचल्याने वाहतुकीलाही अडथळा निर्माण होत होता.

                 राजापूर पूर्व परिसरात गारांचा पाऊस     

राजापूर: तालुक्यातील पूर्व परिसरात शनिवारी सायंकाळी गारांचा पाऊस कोसळला. गेले दोन दिवस कमालीचा उकाडा जाणवत असताना गारांसह पाऊस पडल्याने बागायतदार चिंतेत सापडले आहेत. गेले दोन दिवस कमालीचा उकाडा जाणवत होता. अशातच शनिवारी सायंकाळी पूर्व परिसरात पावसाच्या हलक्या सरी कोसळण्यास सुरूवात झाली. या पावसासोबत गाराही पडल्या. सातत्याने पाऊस पडत असल्याने बागायतदारांच्या चिंतेत भर पडली आहे.

चिपळुणात पावसाचा शिडकावा

 चिपळूण: शहर परिसरातील नागरिक शनिवारी दिवसभर उकाडय़ाने हैराण झालेले असतानाच सायंकाळी पावसाचा हलकासा शिडकावा झाला. शनिवारी दुपारपर्यत कडाक्याचे ऊन होते. मात्र दुपारनंतर आकाश भरून गेले. त्यातच पाच वाजल्यानंतर सुटलेला वारा आणि त्यानंतर पावसाचा शिडकावा झाला. यामुळे उष्मा अधिकच वाढला.

                   लांजा तालुक्यात पावसाच्या सरी

लांजा: दिवसभर उष्म्याने अंगाची लाहीलाही होत असताना शनिवारी सायंकाळी 6.30 वाजता अचानक वादळी वारा व मेघगर्जनेसह पावसाच्या हलक्या सरी पडल्या. 15 ते 20 मिनिटे पावसाची रिमझिम सुरू होती.