|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » काजूबागेत गावठी बॉम्बचा स्फोट

काजूबागेत गावठी बॉम्बचा स्फोट 

तात्काळ चौकशी करण्याची गोपाळ गवस यांची मागणी

प्रतिनिधी / साटेली – भेडशी:

कसई-दोडामार्ग येथील गोपाळ गवस यांच्या काजूबागेत गावठी जिवंत बॉम्बचा स्फोट होऊन जीवितास धोका निर्माण झाला असून याचा तपास व्हावा व न्याय  मिळावा, अशी मागणी निवेदनाद्वारे दोडामार्ग पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

याबाबत तक्रारदार गोपाळ गवस यांनी दिलेल्या माहितीनुसार, श्री. गवस यांचा भाऊ अरुण गवस व कामगार परशुराम हे आपल्या काजूबागेत काजू आणण्यासाठी गेले असता वाटेवर जिवंत गावठी बॉम्बचा स्फोट झाला. त्यामध्ये त्यांचा भाऊ व कामगार यांना किरकोळ दुखापत झाली. सुदैवाने मात्र मोठा अनर्थ टळला.  स्फोटामागचा उद्देश हा दोघांनाही ठार मारण्याचा होता, असा आरोप करीत हे कृत्य गोविंद गुणाजी गवस व रावजी बाळकृष्ण गवस या दोहोंनी केल्याचा संशय गोपाळ गवस यांनी व्यक्त केला आहे. याआधी अनेकदा जीवे मारू, तिलारी कालव्यात ढकलून देऊ, हात कापू अशा धमक्मया दिल्या होत्या. कसई देवस्थानच्या कामात या व्यक्तीकडुन कायम अडथळा केला जातो. याबाबत दोडामार्ग न्यायालयात यांच्याविरुद्ध दावा न्यायप्रविष्ठ असून गोविंद गुणाजी गवस यांचा मुलगा जयराम गोविंद गवस यांच्याविरुद्ध मार्चमध्ये फिर्याद दाखल करण्यात आली आहे. वरील व्यक्तींकडुन माझ्या व कुटुंबियांच्या जीवितास धोका आहे आणि काही अनर्थ घडल्यास वरील व्यक्ती जबाबदार आहे, असा आरोप करत गावठी बॉम्ब तयार करणाऱया टोळीचाही शोध घ्यावा आणि आपणास न्याय मिळावा, अशी मागणी गोपाळ गवस यांनी केली आहे.