|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » निवडणूक आयोगाकडून ‘प्रचारबंदी’

निवडणूक आयोगाकडून ‘प्रचारबंदी’ 

योगी आदित्यनाथ, मायावती, आझम खान, मनेका गांधी यांच्यावर निर्बंध : वादग्रस्त वक्तव्ये भोवली

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, बसपच्या नेत्या मायावती, समाजवादी पक्षाचे नेते आझम खान आणि भाजप नेत्या मनेका गांधी यांना वादग्रस्त विधाने भोवली आहेत. आदर्श आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने या सर्वांना दणका दिला आहे. योगी आदित्यनाथ आणि आझम खान यांना 72 तास तर मायावती आणि मनेका गांधी यांना 48 तास प्रचारबंदी केली आहे. मंगळवारी सकाळी 6 वाजल्यापासून हा आदेश लागू होणार आहे. जातीय व धार्मिक द्वेष पसरवणारी विधाने केल्याने ही कारवाई निवडणूक आयोगाने केली आहे. मनेका गांधी यांनी मुस्लिमांसंबंधी वादग्रस्त विधान केले होते. तर, सपा नेते आझम खान यांनी आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवार भाजप नेत्या जयाप्रदा यांच्याबाबत वादग्रस्त टिप्पणी केली होती.

सर्वोच्च न्यायालयाच्या आयोगाला सूचना

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयामध्ये याच विषयांवरून दाखल झालेल्या याचिकेचीही सुनावणी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या खंडपीठासमोर झाली. खंडपीठाने निवडणूक आयोगाला अशा द्वेष भाषणांवरून आपण काय कारवाई करू शकता, अशी विचारणा केली आहे. तथापि निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधीने आयोगाला मर्यादित अधिकार असल्याचे स्पष्टीकरण न्यायालयात दिले. परंतु आयोग केवळ नोटीस देऊ शकतो. संबंधितांना इशारा देऊ शकतो आणि शेवटी तक्रार दाखल करु शकतो, असे खंडपीठाने म्हटले आहे. न्यायालयाने आयोगाच्या अधिकारांची मीमांसा करणार असल्याचे तसेच आयोग संविधानिक संस्था असल्याने त्यांच्या अधिकाराची माहिती देण्याकरता मंगळवारी सुनावणी निश्चित केली आहे. याकरता संपूर्ण माहिती असणाऱया अधिकाऱयाची नियुक्ती करावी, अशा सूचनाही करण्यात आल्या आहेत.

काय म्हणाल्या होत्या मायावती

सहरानपूर, देवबंद येथे सपा-बसपा आणि रालोदची संयुक्त प्रचार सभा झाली होती. या सभेत बसपच्या नेत्या मायावती यांनी भाजप तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. तसेच मी खास मुसलमान समाजातील लोकांना सांगू इच्छिते की तुम्ही भावनेच्या भरात मतदान करु नका. एकगठ्ठा मतदान महाआघाडीला केले पाहिजे, असे वक्तव्य केले होते. धर्म आणि जातीच्या आधारावर मत मागणे हा आदर्श आचारसंहितेचा भंग आहे. त्यामुळे मायावती यांच्या भाषणाचा अहवाल स्थानिक प्रशासनाकडून मागवला होता. त्यानंतर आयोगाने त्यांच्यावर 48 तास प्रचार सभांमध्ये सहभाग घेण्यास बंदी घातली होती.

योगी आदित्यनाथ काय म्हणाले

मायावतींच्या या वक्तव्याचा निषेध करताना मेरठ येथे झालेल्या सभेत योगी आदित्यनाथ यांनी मायावतींच्या वक्तव्याची आठवण करून दिली. ते म्हणाले, काय म्हणाल्या होत्या, आम्हाला केवळ मुस्लिमांची मते मिळू देत, बाकी गटबंधनची गरज नाही. मी पण तुम्हाला सांगू इच्छितो, जर काँग्रेस, सपा, बसपा आणि लोकदल प्रत्येक मंचावर अली अली असे सांगत एक हिरवा व्हायरस घेऊन देशाला डंख मारु इच्छित आहेत. पण त्यांना ठाऊक नाही, बजरंग बलीचे अनुयायी यांना कधीच सहन करणार नाहीत. पश्चिम उत्तर प्रदेशातून या हिरव्या व्हायरसला आणण्याची गरज नाही, असे म्हटले होते. निवडणूक आयोगाने याची दखल घेत त्यांच्यावर 72 तास प्रचार बंदी घातली आहे.