|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » क्रिडा » वर्ल्डकपसाठी ऑस्ट्रेलियन संघ जाहीर

वर्ल्डकपसाठी ऑस्ट्रेलियन संघ जाहीर 

अनुभवी स्टिव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नरचे कमबॅक, ऍरॉन फिंचकडे नेतृत्वाची धुरा,

वृत्तसंस्था/ सिडनी

इंग्लंडमध्ये 30 मे पासून होणाऱया आयसीसी विश्वचषक स्पर्धेसाठी सोमवारी 15 सदस्यीय ऑस्ट्रेलियन संघाची घोषणा करण्यात आली. अनुभवी ऍरॉन फिंचकडे संघाच्या नेतृत्वाची धुरा कायम ठेवण्यात आली आहे. विशेष म्हणजे, चेंडूशी छेडछाड केल्याप्रकरणी घालण्यात आलेली बंदी उठवल्यानंतर डेव्हिड वॉर्नर व स्टिव्ह स्मिथ यांचे ऑसी संघात पुनरागमन झाले आहे. फॉर्ममध्ये असलेल्या जोस हॅजलवूड व पीटर हॅण्डस्कोम्ब यांना मात्र संघातून वगळल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

ऑस्ट्रेलियन निवड समितीचे अध्यक्ष ट्रेव्हर जोन्स यांनी सिडनी येथे विश्वचषकासाठी संघ जाहीर केला. ‘मागील सहा महिन्यात ज्या प्रकारे संघ तयार झाला आहे, त्याचे समाधान आहे. अलीकडेच ऑस्ट्रेलियन संघाने भारत व पाकिस्तानविरुद्ध वनडे मालिका जिंकल्याने खेळाडूंचे मनोबल उंचावले आहे. आता, आगामी विश्वचषक स्पर्धेत ऑसी संघ जेतेपदाच्या निर्धारानेच उतरेल’ अशी प्रतिक्रिया जोन्स यांनी संघ निवडीनंतर दिली. गतवर्षी चेंडू छेडछाड प्रकरणी वॉर्नर व स्मिथ यांच्यावर एका वर्षाची बंदी घालण्यात आली होती. यानंतर, या दोघांनी आयपीएलमध्ये खेळताना शानदार कामगिरी केली आहे. हे दोघे जागतिक दर्जाचे खेळाडू आहेत, आगामी वर्ल्डकपमध्येही त्यांच्याकडून दर्जेदार कामगिरी होईल असा विश्वासही जोन्स यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच निवड समितीने वॉर्नर व स्मिथ यांना 2019-20 या वर्षात राष्ट्रीय करार यादीतदेखील स्थान देण्यात आले आहे.

ऍरॉन फिंचकडे नेतृत्वाची धुरा कायम

विश्वचषकासाठी निवड समितीने पुन्हा एकदा ऍरॉन फिंचवर विश्वास दाखवताना संघाच्या नेतृत्वाची धुरा सोपवली आहे. अलीकडेच झालेल्या वनडे मालिकेत फिंच व उस्मान ख्वाजा यांनी सलामीची जबाबदारी स्वीकारली होती. पण वॉर्नरच्या समावेशामुळे वर्ल्डकपमध्ये सलामीला कोण येणार, याची उत्सुकता आहे. शॉन मार्श, ग्लेन मॅक्सवेल, अष्टपैलू मार्क स्टोनिस यांच्यावर मधल्या फळीची जबाबदारी असेल. तसेच नॅथन लियॉन व ऍडम झम्पा या दोन फिरकीपटूंसह पॅट कमिन्स, बेहरेनडॉर्फ, मिचेल स्टार्क, जॉय रिचर्डसन, नॅथन कोल्टर नाईल यांच्यावर गोलंदाजीची भिस्त असणार आहे. तसेच ऍलेक्स केरीला यष्टीरक्षकाच्या रुपाने संघात संधी देण्यात आली आहे.

वॉर्नर व स्मिथची संघात वर्णी लागल्यामुळे पीटर हॅण्डस्कोम्बला संघाबाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दुखापतीने त्रस्त असलेल्या जोस हॅजलवूडला ऑगस्टमध्ये होणाऱया ऍशेस मालिकेच्या दृष्टीने  तयार होण्यासाठी विश्रांती दिली असल्याचे समजते. मात्र, अलीकडील काळात या दोघांच्या कामगिरीत सातत्य असल्याने या दोघांना का वगळण्यात आले, याचे कारण मात्र समजले नाही.

ऑस्ट्रेलियन वनडे संघ : ऍरॉन फिंच (कर्णधार), उस्मान ख्वाजा, डेव्हिड वॉर्नर, स्टिव्ह स्मिथ, शॉन मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्क स्टोनिस, ऍलेक्स केरी, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, जॉन रिचर्डसन, नॅथन कोल्टर नाईल, पीटर हॅण्डस्कोम्ब, जेसॉन बेहरेनडॉर्फ, नॅथन लियॉन व ऍडम झम्पा.  

ऑस्ट्रेलियाचा सलामीचा सामना अफगाणशी

विश्वचषक स्पर्धेत सहाव्या जेतेपदाच्या निर्धाराने उतरणाऱया ऑस्ट्रेलियन संघाची सलामीची लढत दि. 1 जुन रोजी अफगाणिस्तानविरुद्ध होणार आहे. यानंतर, 6 रोजी वेस्ट इंडिजशी, 9 रोजी भारताशी, 12 रोजी पाकिस्तानशी, 15 रोजी श्रीलंकेशी, 20 रोजी बांगलादेशी, 25 रोजी इंग्लंडशी, 29 रोजी न्यूझीलंडशी तर 6 जुलै रोजी द.आफ्रिकेशी ऑस्ट्रेलियाच्या लढती होतील. तसेच विश्वचषक स्पर्धेआधी ऑस्ट्रेलियन संघ न्यूझीलंडमध्ये तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे.