|Monday, June 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » जुन्या चित्रपटांचे डिजीटलायझेशन गरजेचे

जुन्या चित्रपटांचे डिजीटलायझेशन गरजेचे 

प्रतिनिधी/कोल्हापूर

जुन्या मराठी चित्रपटांच्या चित्रिकरणाचा दर्जा सुमार होता. आजच्या नव कलाकारांना ते दाखवायचे झाल्यास पडद्यावर अस्पष्ट दिसतात. यातील जुने तंत्रज्ञ-कलाकार याविषयी तरूणांना माहिती द्यायची झाल्यास त्या चित्रपटांचे डिजीटलायझेशन आवश्यक आहे. असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानारून केले.

राजा परांजपे प्रतिष्ठान आणि गुणीदास फौंडेशनतर्फे आयोजित राजा परांजपे महोत्सवास रविवारी संगितसूर्य केशवराव भोसले नाटय़गृहामध्ये प्रारंभ झाला. फौंडेशनचे अध्यक्षा अर्चना राणे, सदस्य अजय राणे आणि गुणीदास फौंडेशनचे अध्यक्ष शिरीष सप्रे यांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान, प्रसिद्ध अभिनेते सिद्धार्थ जाधव, इरावती हर्षे, दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी व संगीतकार अजित परब यांना ‘राजा परांजपे सन्मानाने गौरविण्यात आले.

चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले म्हणाले, चित्रपटांच्या डिजीटलायझेशनबाबत महामंडळाने शासनासोबत चर्चा करून याचा पाठपुरावठा केला आहे. याच्या पहिल्या टप्प्यात राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर मोहोर उमटवलेल्या 20 चित्रपटांचे डिजीटलायझेशन करण्याचा निर्णयही घेण्यात आल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

पुरस्कार प्राप्त संगीतकार अजित परब म्हणाले, राजा परांजपे यांच्या चित्रपटांनी सामाजिक भान जपले. गुणवत्ता राखली. हे आज प्रत्येकाला शक्य आहे असे नाही. अशा नावाचा पुरस्कार मिळाल्याने भारावून गेलो असल्याचे आनंदोद्गार त्यांनी काढले. अभिनेते जाधव म्हणाले, राजा परांजपे यांनी एक काळ गाजवला. त्यांच्या चित्रपटाविषयी तरूणांना माहिती होणे आवश्यक आहे. त्यामुळे अशा महोत्सवाची गरज असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी म्हणाले, लहानपणी बाबुजी, गदीमा यांच्या संगीताची जादू होती. पण गाजलेल्या मराठी चित्रपटाच्या संगीतात राजा परांजपे यांच्या चित्रपटाची संख्या असल्याचे अभ्यासातून समजले. कार्याचा उलगडा होत गेला. इरावती हर्षे म्हणाल्या, राजा परांजपे महोत्सवातून जुन्या चित्रपटाच्या आठवणींना उजाळा मिळाला आहे. वेगळ्या शैलीने साकारलेल्या संगीतातून प्रोत्साहन मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, महोत्सवामध्ये ऋणानुबंध संगीत नृत्याचा कार्यक्रम सादर करण्यात आला. तसेच प्रसिद्ध अभिनेते सिद्धार्थ जाधव, इरावती हर्षे, दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी व संगीतकार अजित परब यांची अक्षय जोशी यांनी मुलाखत घेतली. सुत्रसंचालन सायली गीते यांनी केले.