|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » कोंगनोळीत आढळला प्राचीन जैन मूर्तीलेख

कोंगनोळीत आढळला प्राचीन जैन मूर्तीलेख 

मानसिंगराव कुमठेकर/ मिरज

कवठेमहांकाळ तालुक्यातील कोंगनोळी येथे भगवान पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरातील भगवान पार्श्वनाथांच्या मूर्तीपीठावर 11 व्या शतकातील हळेकन्नड लिपीतील शिलालेख आढळून आला आहे. या शिलालेखातून तत्कालीन जैन मुनी संघाची रचना स्पष्ट होते. मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अभ्यासक मानसिंगराव कुमठेकर आणि प्रा. गौतम काटकर यांनी गेली काही दिवस या लेखांवर अभ्यास करुन नवे निष्कर्ष उजेडात आणले आहेत. या मूर्तीलेखांमुळे दक्षिण महाराष्ट्रातील जैन धर्माचा प्राचीन इतिहास उलगडण्यास मदत होणार आहे.

कोंगनोळी येथे सलगरे रोडवर भगवान पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर आहे. या मंदिरात भगवान पार्श्वनाथांची प्राचीन मूर्ती आहे. ही मूर्ती 1966 साली कोंगनोळी येथील गावपांढरीत माती खणत असताना सापडली होती. या मूर्तीबरोबरच 24 तीर्थकरांची एक छोटी मूर्ती आणि गंध उगाळण्याची सहाण देखील मिळाली होती. भगवान पार्श्वनाथांची ही मूर्ती अतिशय सुबक आणि मनोहारी आहे. सुमारे अडीच फुट उंचीची या मूर्तीच्या खालील बाजूला श्री पद्मावती व एका बाजूला यक्ष मूर्ती आहेत. या गावाचे नाव पूर्वी कोंगुनवल्ली असे प्राचीन ताम्रपटात आढळून येते.

ही मूर्ती सापडल्यानंतर काहीकाळ गावातच होती. नंतर जैन समाजातील धार्मिक वृत्तीच्या व्यक्तींनी ही मूर्तीसाठी भव्य मंदिर बांधण्याचा निश्चय केला. त्यासाठी कोंगनोळी-सलगरे रस्त्यावर मोठी जमीनही खरेदी करण्यात आली. त्यासाठी तत्कालीन अध्यक्ष विजय पाटील (जयसिंगपूर), सुरेश कल्याणी (आष्टा), अशोक उपाध्ये (आरग), बाळासा शेट्टी (जयसिंगपूर), अरिंजय पाटील, महावीर शेट्टी, वडगावे बंधू, धनपाल कुसनाळे यांच्यासह अन्य संचालकांनी पुढाकार घेतला. अल्पावधीतच या ठिकाणी भव्य असे प्राचीन वास्तूशैलीला शोभेल असे मंदिर बांधण्यात आले.

याठिकाणी कोंगनोळीत सापडलेल्या भगवान पार्श्वनाथांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. या भगवान पार्श्वनाथांच्या मूर्तीच्या चरणाजवळ तीन ओळींचा हळेकन्नड लिपीतील शिलालेख आहे. सदर शिलालेखाचा अभ्यास गेली काही दिवस मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अभ्यास मानसिंगराव कुमठेकर आणि प्रा. गौतम काटकर यांनी केला. या अभ्यासाठी त्यांना आचार्य जिनसेन महाराज, मुनी पद्मकिर्ती महाराज, मंदिर पदाधिकारी सुहास पाटील, राजू चौगुले, डॉ. रुपाली कुसनाळे, नितीन पाटील, प्रा. पारीसा भोकरे, प्रशांत नाईक यांचे सहकार्य लाभले. सदर शिलालेखात ‘श्री मुलसंघ, देशीय गण, पुस्तक गच्छ, कुंदकुंदान्वय, इंगळेश्वरद बळी, सामंतन बसदी प्रतिष्ठे’, असा उल्लेख आहे. सदर लेखाच्या अक्षरवाटीकेवरुन हा लेख 11 व्या शतकातील म्हणजेच चालुक्य काळातील अन्य शिलालेखांतील अक्षरांशी साम्य दर्शविणारा आहे.

हळेकन्नड लिपीतील या शिलालेखाचे अचूक वाचन हंपी विद्यापीठाचे प्रा. डॉ. कनवीर मन्वाचार्य यांनी करुन दिले. तर त्याचा अचूक मराठी अर्थ प्रा. डॉ. व्ही. एस. माळी यांनी करुन दिला. त्यांनी जैन मुनी संघाच्या रचनेबाबत बहुमल्य मार्गदर्शन केले. त्यावरुन मानसिंग कुमठेकर आणि प्रा. गौतम काटकर यांनी अभ्यास करुन हा लेख उजेडात आणला. या लेखामध्ये जैन धर्मातील प्राचीन अशा मुनी संघातील देशीय गणातील पुस्तक गच्छ शाखेतील कुंदकुंदान्वय मत आचरणात आणणाऱया इंगळेश्वर येथील एका सामंताने सदर ठिकाणी बस्ती स्थापन करुन त्यात मूर्तीची प्रतिष्ठापना केल्याचे म्हटले आहे. जैन धर्मात मुनी संघाला अतिशय महत्त्व आहे. या मुनी संघाच्या सहा संघापैकी मुल संघ हा कर्नाटक भागात सर्वात प्राचीन संघ मानला जातो. या संघात देशीय गणांतर्गत दोन गच्छ म्हणजे शाखा आहेत. त्या म्हणजे पुस्तक अथवा सरस्वती आणि चित्रकुट. त्यापैकी पुस्तक गच्छातील कोंदकुंद आचार्यांच्या मतप्रणालीचा आचरण करणारे म्हणजेच अन्वय करणाऱया इंगळेश्वर या जैन पीठातील सामंताने ही बस्ती बांधली.

त्याकाळात इंगळेश्वर हे जैन धर्मियांचे एक मोठे पीठ होते. हे इंगळेश्वर म्हणजे सध्याच्या बसवकल्याणी गावाजवळ असणारे प्राचीन इंगळेश्वर असावेत. सदरच्या तीन ओळींच्या शिलालेखावरुन कवठेमहांकाळ आणि परिसरात जैन मुनी संघापैकी कोणत्या संघाचा प्रभाव अधिक होता. तत्कालीन जैन धर्मियांच्यावर कोणत्या शाखेच्या विचारसरणीचा पगडा होता, हे या शिलालेखावरुन स्पष्ट झाले आहे. सांगली जिह्यात जैन धर्माचा मोठा प्रभाव दहाव्या आणि अकराव्या शतकात होता. सदरच्या लेखावरुन हीच बाब स्पष्ट झाली आहे. हा लेख उजेडात आल्याने सांगली जिह्याच्या प्राचीन धार्मिक इतिहासात मोलाची भर पडली आहे.