|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » जाहीर प्रचाराच्या तोफा आज थंडावणार

जाहीर प्रचाराच्या तोफा आज थंडावणार 

सुशीलकुमारांच्या अस्तित्वाचा आणि भाजप मंत्र्यांच्या नेतृत्वाच्या लढाईचा कस

शिवाजी भोसले / सोलापूर

माजी केंद्रीय गृहमंत्री तथा काँग्रेसचे राष्ट्रीय नेते सुशीलकुमार शिंदे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते डॉ. प्रकाश आंबेडकर यांच्या उमेदवारीमुळे देशात चर्चेत आणि केंद्रस्थानी आलेल्या सोलापूर लोकसभेच्या महासंग्राम भूमीवर हायव्होल्टेज निवडणुकीची धूमशान सुरु आहे. दरम्यान, या निवडणुकीच्या जाहीर प्रचाराच्या तोफा आज सायंकाळी 5 वाजता थंडावणार असून अत्यंत अटीतटीच्या आणि जातीधर्माच्या वळणावर पोहोचलेल्या या निवडणुकीत या मतदारसंघातील साधारण 18 लाखांहून अधिक मतदार सोलापूरचा प्रतिनिधी म्हणून कोणाला संसदेत पाठवणार या संबंधीचा मुकाबला गुरुवारी 18 एप्रिल रोजी होणार आहे.  

सोलापूर लोकसभेच्या इतिहासातच पहिल्यांदा विकासाच्या अजेंडय़ाशिवाय आणि जातीधर्माच्या वळणावर होत असलेल्या सोलापूर लोकसभेच्या निवडणुकीसाठी मागील साधारण 20-21 दिवसांपासून प्रचाराच्या तोफा डागल्या जात होत होत्या.  एकीकडे रणरणते ऊन आणि दुसऱया बाजूला लोकसभा निवडणुकीचा टिपेला पोहोचलेला प्रचार यामुळे या मतदारसंघात प्रचंड राजकीय गरमी वाढली होती. निवडणुकीच्या या मतदारसंघाच्या प्रक्रियेनुसार आज जाहीर प्रचार संपत आहे.

देशात लक्षवेधी ठरलेल्या या मतदारसंघात सोलापूरचे सुपुत्र म्हणून राज्याच्या आणि देशाच्या तख्तावर गेली 35-40 वर्षे नेतृत्व करणाऱया सुशीलकुमारांच्या अस्तित्वाची आणि प्रतिष्ठेची ही निवडणूक ठरली आहे. 2014 मध्ये मोदी लाटेत पराभवाची धूळ चाखावी लागलेल्या सुशीलकुमारांना या खेपेस मागील पराभवाचा वचपा काढायचा आहे. त्या दृष्टीकोनातून त्यांनी मागील साधारण दीड वर्षापासून या मतदारसंघात निवडणुकीची तयारी ठेवली होती. विशेषत्वे, निवडणूक प्रक्रिया सुरु झाल्याच्या नंतर 20-21 दिवसांच्या प्रचार काळात शिंदे यांनी आघाडी घेतली. जाहीर सभा, कॉर्नर बैठका, मेळावे आणि पदयात्रा यांनी अक्षरशः वातावरण ढवळून काढले आहे. जातीधर्माच्या राजकारणाला फाटा देऊन मतदारांनी देश वाचविण्यासाठी पर्यायाने सर्वधर्म समभावाचे सरकार केंद्रात येण्याबरोबरच सोलापूरच्या विकासासाठी आपणास मतदान करण्याचे आवाहन त्यांनी मतदारांना केले आहे.

तथापि, ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्या सोलापूर एंट्रीमुळे आणि गौडगाव मठाचे मठाधिपती डॉ.जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या उमेदवारीमुळे सुशीलकुमारांची या निवडणुकीत प्रचंड दमछाक झाली आहे. मत विभाजनाचा फटका बसू नये यासाठी त्यांनी चांगलीच काळजी घेतली आहे. मात्र सोलापूर लोकसभा मतदारसंघातील मतदार त्यांना कितपत कौल देतील हे निकालाअंतीच स्पष्ट होणार आहे.

युतीच्या माध्यमातून आखाडय़ात उतरलेल्या डॉ. शिवाचार्य महास्वामी यांनीदेखील प्रचार चांगलाच वाढविला होता. वास्तविक भाजपाची उमेदवारी लवकर घोषित न झाल्यामुळे शिवाचार्य महास्वामी यांना प्रचारासाठी वेळ कमी मिळाला आहे. सहा विधानसभेच्या ठिकाणी सर्वत्र त्यांचा प्रचार पोहोचू शकला नाही. तरीपण शिवाचार्य महास्वामी यांची निवडणूक आपल्या हाती घेतलेले पालकमंत्री विजयकुमार देशमुख तसेच सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यासह भाजपाच्या टीमने प्रचार आपापल्या परीने पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. लिंगायत समाजाच्या वोट बँकेवर नजर ठेवून भाजपाने महास्वामींना या निवडणुकीच्या आखाडय़ात उतरविले आहे. 

सोलापूर लोकसभेच्या युध्दभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार ऍड. प्रकाश आंबेडकर यांची उशिरा एंट्री झाली. तसेच अकोल्यातूनदेखील लढत आहेत. प्रचाराच्या दोन टप्प्यात ते सोलापुरात आले. दलित, मुस्लीम, धनगर यांच्यासह अठरापगड जातींना वंचित आघाडीच्या झेंडय़ाखाली आणण्याचा पर्यायाने आपल्या पाठिशी या संबंधितांची ताकद उभी रहावी यासाठी आंबेडकरांनी प्रयत्न केले आहेत. सोलापूर शहरात त्यांचा चांगला प्रचार झाला आहे. मतदारसंघातील उर्वरित भागात सर्वत्र प्रचार पोहोचण्याला मर्यादा आल्या आहेत. स्वतः प्रकाश आंबेडकर तसेच त्यांचे बंधू आनंदराज आणि सुपुत्र सुजात यांनी प्रचाराची धुरा सांभाळली आहे. वंचित आघाडीची ताकद आंबेडकरांच्या पाठिशी लागणार का? सोलापूर लोकसभेच्या युध्दभूमीवर आंबेडकर दिल्लीच्या तख्तावर वंचित आघाडीचा झेंडा रोवणार का, हे पाहण्यासाठी मे महिन्याची 23 तारीख उजडावी लागणार आहे.

 

18 लाख मतदार विजयाचा गुलाल उधळण्याची संधी कोणाला देणार?

सोलापूर लोकसभेच्या युध्दभूमीवर तिरंगी निकराच्या झुंजीचा सामना होत आहे. सुशीलकुमार शिंदे, डॉ. शिवाचार्य महास्वामी आणि प्रकाश आंबेडकर या तिघांमध्ये प्रचंड टस्सल होत आहे. हायव्होल्टेज निवडणुकीत या तिघांपैकी विजयाचा गुलाल  उधळण्याची संधी या मतदारसंघातील 18 लाखांहून अधिक मतदार कोणाला देणार याचे प्रचंड औत्सुक्य आहे. 

 

जातीधर्माच्या मतांची घातली गणिते

सोलापूर लोकसभेच्या या निवडणुकीत प्रत्यक्ष 13 उमेदवार आखाडय़ात असले तरी तिरंगी फाईट आहे. सुशीलकुमार शिंदे, डॉ. शिवाचार्य महास्वामी आणि प्रकाश आंबेडकर या तिन्ही उमेदवारांकडून जातीधर्मांच्या मतांची गणिते घालूनच प्रचार करण्यात आला आहे. मतांच्या विभागणीचा फटका कोणाला बसणार आणि या निवडणुकीत सोलापूरचा खासदार म्हणून कोण बाजी मारणार याचा अंदाज कोणालाही लागत नसल्याची वस्तुस्थितीदर्शक स्थिती या मतदारसंघाची आहे.