|Monday, June 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » सासष्टीतील चार मतदारसंघात भाजपला आघाडी मिळणार

सासष्टीतील चार मतदारसंघात भाजपला आघाडी मिळणार 

प्रतिनिधी/ मडगाव

सासष्टी तालुक्यातील आठ पैकी चार मतदारसंघात भाजपला आघाडी मिळणार असून त्यात नावेली मतदारसंघाचा समावेश असेल दावा भाजपचे प्रदेश अध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी काल नावेली मतदारसंघातील बूथ मेळाव्यात बोलताना केला. नावेली मतदारसंघातील प्रत्येक भाजप कार्यकर्त्याने त्यासाठी आपले योगदान द्यावे लागेल, असे ते म्हणाले.

दवर्ली पंचायत सभागृहात नावेली मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा बूथ मेळावा झाला. या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी प्रदेश अध्यक्ष तथा राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, पक्षाचे सचिव सदानंद शेट तानावडे, उमेदवार नरेंद्र सावईकर, दक्षिण गोवा अध्यक्ष सर्वानंद भगत तसेच जिल्हा पंचायत सदस्य उल्हास तुयेकर, शेख जीना, पक्षाचे उपाध्यक्ष प्रकाश वेळीप, सत्यविजय नाईक तसेच नावेली मंडळ अध्यक्ष दामोदर नाईक यांचा समावेश होता.

भाजपचा सर्वसामान्य कार्यकर्ता हा नेताच

हल्लीच काँग्रेसचे प्रचार प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी भाजपकडे नेते नसल्याची जोरदार टीका केली होती. या टीकेला उत्तर देताना विनय तेंडुलकर म्हणाले की, भाजपकडे नेते नाहीत हे इतरांनी आम्हाला सांगण्याची गरज नाही. भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी दिगंबर कामत हे दिल्लीला गेले होते. मात्र, त्या ठिकाणी त्यांना पक्षाचा दरवाजा खुला झाला नाही. त्यामुळे त्यांच्याकडून अशी विधाने होतात. भाजपचा सर्वसामान्य कार्यकर्ता हा देखील नेताच असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

खासदार नरेंद्र सावईकर यांनी गेल्या पाच वर्षात अनेक विकासकामे दक्षिण गोव्यात राबविली, त्यात पूल, रस्ते तसेच सरकारच्या इतर योजना यांचा समावेश आहे. ते प्रामाणिक उमेदवार असल्याने मतदारांनी त्यांना पुन्हा एकदा पाठिंबा देण्याचे आवाहन केले.

निवडणुका या जिंकण्यासाठीच असतात

या मेळाव्यात बोलताना उमेदवार नरेंद्र सावईकर म्हणाले की, निवडणूक मग ती कोणतीही असो, ती जिंकण्यासाठीच असते व पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांने त्यासाठी योगदान द्यावे लागेल. आपला देश कुणाच्या हाती सुरक्षित असेल यांचा निर्णय जनतेला या निवडणुकीतून घ्यावा लागणार आहे. देश सुरक्षित राहिल्यास मुलांचे भवितव्य चांगले घडेल. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चांगले प्रशासन दिले असल्याने पुन्हा एकदा मतदार त्यांना संधी देतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा लोकांनी फक्त ट्रेलर पाहिला आहे. पण, अद्याप खरे पिक्चर अद्याप यायचा बाकी आहे. त्यासाठी मतदारांनी त्यांना पुन्हा एकदा भाजपला मतदान करावे असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी सदानंद तानावडे यांनी बूथ कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना, प्रत्येकाने आपले जबाबदारी योग्यरित्या उचलली पाहिजे. निवडणुकीच्या दिवशी आपला मतदारसंघात जाऊ नये. प्रत्येक मत हे महत्त्वाचे असल्याने मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्याचा सल्ला दिल्ला. नावेली मतदारसंघात भाजपला जर दोन हजार मतांची आघाडी मिळाली तर आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप आपला उमेदवार या मतदारसंघात उभा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या पूर्वी अपक्षाला पाठिंबा दिला होता व भाजपच्या पाठिंब्याने ते निवडून आले होते याकडे त्यांनी कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले.

यावेळी सर्वानंद भगत, प्रकाश वेळीप, सत्यविजय नाईक, उल्हास तुयेकर, शेख जीना इत्यादींनी आपले विचार मांडले.