|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » वेदगंगेत तहान भागविणारे पाणी दाखल

वेदगंगेत तहान भागविणारे पाणी दाखल 

वार्ताहर/ निपाणी

निपाणीसह परिसरातील ग्रामीण भागात पिण्यासह शेती पाणी पुरवठय़ासाठी वरदान ठरलेली वेदगंगा नदी गेल्या आठ दिवसापासून कोरडी पडली होती. यामुळे शेतीपिके धोक्यात आली होतीच. पण त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता. यामुळे सर्वांच्या नजरा वेदगंगेत काळम्मावाडी धरणातून चिखली बंधाऱयामार्गे कधी पाणी सोडले जाणार याकडे लागल्या होत्या. असे असताना सोमवारी वेदगंगा नदीत पाणी दाखल झाले. यामुळे तहान भागविणारे पाणी वेदगंगेत दाखल झाल्याचे समाधान परिसरातून व्यक्त होत आहे.

निपाणी शहराला जवाहर तलावातून पाणी पुरविले जाते. पण जवाहर तलावाची पाणीपातळी दिवसेंदिवस घटू लागल्याने निपाणीवर पाणीबाणीचे संकट गडद झाले होते. हे संकट दूर होण्यासाठी वेदगंगेतून पाणीपुरवठा हाच एक आशेचा किरण होता. सध्या हे पाणी दाखल होताच निपाणीवरील पाणीबाणीचे संकट काहीसे दूर झाले असून येत्या काळात पाण्याचे नियोजन काटेकोर करण्याची गरज व्यक्त होत आहे.

सोमवारी सकाळी चिखली बंधाऱयातून वेदगंगेत पाणी दाखल होताच पाटबंधारे विभागाने जिल्हाधिकाऱयांनी दिलेल्या निर्देशानुसार उपसाबंदी लागू केली. याची कार्यवाही म्हणून हेस्कॉमने शेती पाणी योजनेचे वीज कनेक्शन बंद करण्याची कार्यवाही केली. गतवेळी काही ठिकाणी शेतकऱयांनी या उपसाबंदी कार्यवाहीतून पळवाट काढत डिझेल इंजिनचा वापर करून पाणी उपसा केल्याची चर्चा होती. यामुळे दाखल झालेले पाणी अवघे सहा दिवसातच संपले होते. असा प्रकार घडू नये यासाठी हेस्कॉमकडून नदीकाठावर रात्रीच्या गस्तीची गरज व्यक्त होत आहे.