|Monday, June 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » बेळगावचा सईश मेंडके राज्यात चौथा

बेळगावचा सईश मेंडके राज्यात चौथा 

जीएसएस महाविद्यालयाचा विद्यार्थी, सईशने विज्ञान शाखेत मिळविले 98.50 टक्के गुण

प्रतिनिधी/ बेळगाव

शैक्षणिक वाटचालीत टर्निंग पॉईंट ठरणारा बारावीचा निकाल सोमवारी जाहीर झाला असून बेळगावचा सईश श्रीकांत मेंडके याने 98.50 टक्के गुण मिळवत राज्यात चौथा येण्याचा मान मिळविला आहे. जीएसएस महाविद्यालयाचा विद्यार्थी असणारा सईश याने विज्ञान शाखेतून 600 पैकी 591 गुण मिळवत राज्यात चौथा तर जिल्हय़ात प्रथम क्रमांक मिळविला आहे. केमिस्ट्री विषयात 100 पैकी 100 गुण मिळविले असून फिजिक्स, गणित, बायोलॉजी, हिंदी या विषयांमध्ये प्रत्येकी 99 तर इंग्रजीमध्ये 95 गुण मिळविले आहेत. अभियंता बनण्याचे स्वप्न उराशी बाळगत आई-वडिलांचे प्रोत्साहन, भावाची प्रेरणा आणि प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली त्याने हे यश मिळविले आहे.

या यशाविषयी सईश मेंडके याच्याशी संवाद साधला असता, अभ्यासातील सातत्य आणि स्वतःवरील विश्वास हे यशाचे गमक असल्याचे सांगून दहावीपासून बारावीतील टॉपरपर्यंतचा प्रवास त्याने उलगडला. निकालाची टक्केवारी 98 पर्यंत मिळेल, असा विश्वास होता. मात्र राज्यात पहिल्या पाचमध्ये येईन याची कल्पना नव्हती. रोज महाविद्यालय तसेच टय़ुशनमध्ये शिकविलेल्या भागाची सेल्फस्टडी करून सराव केल्याने प्रत्येक विषय आणि भागाचा अभ्यास ज्या त्या वेळी होत गेला. यामुळे बारावी परीक्षा कठीण असल्याचे जाणवले नाही.

दहावीमध्ये 97.92 टक्के गुण मिळविले होते. यामुळे यापेक्षा अधिक गुण घेण्याचा विश्वास निर्माण केला. भाऊ समर्थ मेंडके याने देखील दहावी-बारावीत 94 ते 95 टक्के गुण मिळविले होते. यामुळे त्याची प्रेरणा सोबत होती. रोज अभ्यास कसा करायचा तसेच नियोजन कसे करायचे, याविषयी भावासोबत चर्चा व्हायची. आई सुजाता मेंडके आणि वडील श्रीकांत मेंडके यांचे प्रोत्साहन तसेच कॉलेजच्या प्राध्यापकांचे व क्लासचे संदुर सरांचे वेळोवळी मार्गदर्शन लाभले आहे. हे यश आई-वडिलांचे असल्याचे सईश याने सांगितले.

अभियांत्रिकीमध्ये करणार करिअर

बारावीच्या निकालानंतर आता सीईटीची चिंता आहे. सीईटीत चांगले गुण मिळवून अभियांत्रिकीला प्रवेश मिळवायचा आहे. भाऊ अभियंता म्हणून बेंगळूर येथे कार्यरत असून मला देखील अभियांत्रिकी क्षेत्रात करिअर करायचे असल्याचे सांगितले.

विश्वास आणि सातत्य महत्त्वाचे

बारावी अवघड आहे, ही कल्पना डोक्मयातून काढून टाकत थोडा वेळ तरी मन लावून अभ्यास करणे आवश्यक आहे. स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवून अभ्यासाची दिशा ठरविली पाहिजे. प्रयत्नातून यश मिळते असे म्हटले जाते. यामुळे परीक्षा आल्यानंतर अभ्यासाचे ओझे करून न ठेवता पहिल्यापासून अभ्यासात आणि सरावात सातत्य ठेवल्यास यश सहज मिळते, असे सईश याने सांगितले.

चौकट

आनंद गगनात मावत नाही!

 सईशच्या आई-वडिलांनी या यशाबद्दल त्याचे भरभरून कौतुक करत आनंद गगनात मावत नसल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. सईशने परिवाराचे आणि महाविद्यालयाचे नाव उंचावले असून आमचा आशीर्वाद आणि प्रोत्साहन सदैव सोबत राहील. सईशचा भाऊ समर्थ याने देखील दहावी-बारावीत चांगले गुण मिळविले होते. यामुळे समर्थची प्रेरणा देखील सईशच्या पाठीशी असल्याचे त्यांनी सांगितले.