|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » क्रिडा » मुंबई इंडियन्स 5 गडय़ांनी विजयी

मुंबई इंडियन्स 5 गडय़ांनी विजयी 

आरसीबीचा सातवा पराभव, सामनावीर मलिंगाचे 4 बळी

मुंबई / वृत्तसंस्था

सामनावीर लसिथ मलिंगाने भेदक मारा करीत 4 बळी टिपल्यानंतर रोहित शर्मा (19 चेंडूत 28), क्विन्टॉन डी कॉक (26 चेंडूत 40), इशान किशन (9 चेंडूत 21) आणि हार्दिक पंडय़ा (16 चेंडूत नाबाद 37) यांच्या फटकेबाजीमुळे मुंबई इंडियन्सने आयपीएल साखळी सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरचा 5 गडय़ांनी पराभव करीत पाचवा विजय नोंदवला.

आरसीबीचे 172 धावांचे आव्हान मुंबई इंडियन्सने 19 षटकांतच पाच गडय़ांच्या मोबदल्यात पूर्ण केले. आरसीबीचा हा आठ सामन्यातील सातवा पराभव आहे. शेवटच्या दोन षटकांत मुंबईला 22 धावांची गरज असताना 19 व्या षटकांतच हार्दिकने सामना संपविला. त्याने नेगीचा पहिला चेंडू निर्धाव खेळल्यावर नंतरच्या चार चेंडूत दोन षटकार, दोन चौकार मारून 20 धावा वसूल केल्या. सहावा चेंडू नेगीला वाईड टाकला आणि पुढच्या चेंडूवर एक धाव घेत हार्दिकने मुंबईचा विजय साकारला. यापूर्वीही एकदा 2 षटकांत 30 धावांची गरज असताना हार्दिकने नेगीचा षटकात 24 धावा फटकावत सामना संपविला होता. चेन्नईविरुद्धचा तो सामना होता. रोहित व डी कॉक यांनी 7.1 षटकांत 70 धावांची सलामी देत विजयाचा पाया रचला होता. विशेष म्हणजे पहिल्या सहाही फलंदाजांनी दुहेरी धावसंख्या गाठली. सूर्यकुमार यादवने 23 चेंडूत 29, संथ खेळणाऱया कृणाल पंडय़ाने 21 चेंडूत 11 धावा केल्या. यजुवेंद्र चहल व मोईन अली यांनी आपल्या फिरकीवर मुंबईला बऱयापैकी लगाम घातला होता. दोघांनी प्रत्येकी दोन बळी टिपताना अनुक्रमे 27 व 18 धावा दिल्या.

डीव्हिलियर्सची फटकेबाजी, मलिंगाचा भेदक मारा

तत्पूर्वी, एबी डीव्हिलियर्स (51 चेंडूत 75) व मोईन अली (32 चेंडूत 50) यांनी शानदार अर्धशतके झळकावल्यानंतर आरसीबीने मुंबई इंडियन्सविरुद्ध 20 षटकात 7 बाद 171 धावा जमवल्या. वास्तविक, आरसीबीला दोनशे धावांच्या उंबरठय़ापर्यंत पोहोचणे सहज शक्य झाले असते. पण, आघाडी फळीनंतर त्यांच्या पाच फलंदाजांना एकत्रित केवळ दोनच धावा जमवता येणे आश्चर्याचे ठरले.

प्रारंभी, पार्थिव पटेल (28) व कर्णधार विराट कोहली (8) बाद झाल्यानंतर एबीडी व मोईन अली यांनी तिसऱया गडय़ासाठी 95 धावांची दमदार भागीदारी साकारली. मात्र, त्यानंतर स्टोईनिस (0), आकाशदीप नाथ (2), पवन नेगी (0), उमेश यादव (नाबाद 0), सिराज (नाबाद 0) यांना एकत्रित दोन धावांवर समाधान मानावे लागले. यापैकी सिराज एकही चेंडू न खेळता शून्यावर नाबाद राहिला. मुंबईच्या मलिंगाने 31 धावांत 4 बळी मिळविले तर बेहरेनडॉर्फ, हार्दिक पंडय़ा यांनी एकेक बळी मिळविले. 

संक्षिप्त धावफलक

आरसीबी : 20 षटकात 7 बाद 171 (एबी डीव्हिलियर्स 51 चेंडूत 6 चौकार, 4 षटकारांसह 75, मोईन अली 32 चेंडूत 1 चौकार, 5 षटकारांसह 50, पार्थिव पटेल 20 चेंडूत 4 चौकार, 1 षटकारासह 28, विराट कोहली 9 चेंडूत 8. अवांतर 8. मलिंगा 4 षटकात 4-31, बेहरेनडॉर्फ, हार्दिक पंडय़ा प्रत्येकी 1 बळी). मुंबई इंडियन्स 19 षटकांत 5 बाद 172 : डी कॉक 40 (26 चेंडूत 5 चौकार, 2 षटकार), रोहित शर्मा 28 (19 चेंडूत 2 चौकार, 2 षटकार), सूर्यकुमार यादव 29 (23 चेंडूत 2 चौकार, 1 षटकार), इशान किशन 21 (9 चेंडूत 3 षटकार), कृणाल पंडय़ा 11 (21 चेंडूत 1 चौकार), हार्दिक पंडय़ा नाबाद 37 (16 चेंडूत 5 चौकार, 2 षटकार), अवांतर 6, गोलंदाजी : चहल 2-27, मोईन अली 2-18, मोहम्मद सिराज 1-21, नेगी 0-47, सैनी 0-34, उमेश यादव 2 षटकांत 0-25.