|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » क्रिडा » वर्ल्डकपसाठी पंतऐवजी दिनेश कार्तिकला संधी

वर्ल्डकपसाठी पंतऐवजी दिनेश कार्तिकला संधी 

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली 15 सदस्यीय संघ जाहीर

मुंबई-नवी दिल्ली / वृत्तसंस्था

आयसीसी वनडे विश्वचषक स्पर्धेसाठी दिनेश कार्तिक 12 वर्षांनंतर भारतीय संघात परतला असून यष्टिरक्षक या नात्याने महेंद्रसिंग धोनीचा वारसदार म्हणून ओळखल्या जाणाऱया ऋषभ पंतची मात्र येथे निराशा झाली आहे. दि. 30 मे पासून इंग्लंडमध्ये खेळवल्या जाणाऱया या स्पर्धेसाठी 33 वर्षीय दिनेश कार्तिकला निवडले जाणार की, ऋषभ पंतला याबद्दल कमालीची उत्सुकता होती. त्याला येथे पूर्णविराम मिळाला. आगामी विश्वचषकात भारतीय संघाने चौथ्या स्थानासाठी विजय शंकर, केएल राहुल व केदार जाधव असे चार पर्याय समोर ठेवेल, हे देखील यात निश्चित झाले. सोमवारी राष्ट्रीय निवड समितीने या स्पर्धेसाठी 15 सदस्यीय संघ जाहीर केला.

धोनीला पर्यायी यष्टिरक्षक ऋषभ पंत असेल, असे यापूर्वीचे आडाखे होते. या दृष्टीने त्याची मागील काही दौऱयात, सामन्यात चाचपणी देखील केली गेली होती. पण, 33 वर्षीय दिनेश कार्तिकचा 91 वनडे सामन्यांचा अनुभव मोलाचा ठरला आणि 21 वर्षीय पंतऐवजी कार्तिकला पसंती मिळाली.

राष्ट्रीय निवड समितीने सोमवारी संघघोषणा केली, त्यावेळी निवड समिती अध्यक्ष एमएसके प्रसाद यांना पंतला वगळले जाणे आणि दिनेश कार्तिकची निवड, याच मुद्यांवर अधिक प्रश्नांना सामोरे जावे लागले.

यावर बोलताना एमएसके प्रसाद म्हणाले, ‘पर्यायी यष्टिरक्षक कोण असावा, यावरच आम्ही अधिक सविस्तर चर्चा केली. त्यानंतर माही दुखापतग्रस्त असेल तर त्याच्याऐवजी दिनेश कार्तिक किंवा ऋषभ पंत यांच्यापैकी एक जण संघात असावा, यावर आमचे एकमत झाले आणि उपांत्यपूर्व किंवा उपांत्यसारखा महत्त्वाचा सामना असेल तर त्यात यष्टिरक्षण अनन्यसाधारण महत्त्वाचे असेल, हे नजरेसमोर ठेवत आम्ही दिनेश कार्तिकला संधी दिली. असे नसते तर ऋषभ पंतचे वर्ल्डकप संघातील स्थान जवळपास निश्चित होते’.

विजय शंकरला अपेक्षित संधी

तामिळनाडूचा मध्यमगती गोलंदाज अष्टपैलू विजय शंकरचा समावेश, हे देखील या संघनिवडीचे ठळक वैशिष्टय़ ठरले. विजय शंकरला प्रामुख्याने फलंदाजी अधिक भक्कम करण्यासाठी चौथ्या स्थानी खेळवले जाऊ शकते. यापूर्वी, अम्बाती रायुडूला  चौथ्या स्थानी पसंती मिळेल, असे मानले जात होते. पण, मागील महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या मैदानावरच झालेल्या मालिकेत रायुडूने खूपच निराशा केली होती. त्याचा त्याला फटका बसला.

‘2017 मधील चॅम्पियन्स चषक स्पर्धेनंतर लवकरच आम्ही विश्वचषकासाठी संघबांधणीची मोहीम सुरु केली होती आणि त्या दृष्टीने विजय शंकरसारख्या अनेक खेळाडूंची चाचपणी केली’, असे निवड समिती अध्यक्ष एमएसके प्रसाद यावेळी म्हणाले.

केएल राहुलबद्दल निवड समितीत फारशी साशंकता नव्हती. तो विश्वचषकात पर्यायी सलामीवीर असेल किंवा त्याला आवश्यकतेप्रमाणे चौथ्या स्थानीही उतरवले जाईल, असे संकेत यावेळी देण्यात आले. विजय शंकरप्रमाणेच केदार जाधवही चौथ्या स्थानी खेळू शकतो आणि आघाडी फळीत केएल राहुल देखील उपयुक्त ठरु शकतो. अंतिम संघनिवड संघव्यवस्थापनावर अवलंबून असेल, असे निवड समिती अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी नमूद केले.

स्पर्धेच्या उत्तरार्धासाठी रवींद्र जडेजाला संधी

इंग्लंडमधील खेळपट्टय़ा स्पर्धेच्या उत्तरार्धात अधिक कोरडय़ा, ठणठणीत होतील आणि त्यावेळी रवींद्र जडेजासारखा अष्टपैलू खेळाडू उपयुक्त ठरु शकतो, हे लक्षात घेऊन आम्ही त्याला निवडले आहे. मागील दीड वर्षांच्या कालावधीत यजुवेंद्र चहल व कुलदीप यादव यांनी आम्हाला अनेक सामने जिंकून दिले आहेत. पण, एखाद्या प्रसंगी अंतिम 11 सदस्यीय संघात अतिरिक्त अष्टपैलू खेळाडू देखील असावा लागतो. त्यामुळे, आम्ही जडेजाला पसंती दिली, असेही एमएसके प्रसाद म्हणाले.

हार्दिक पंडय़ा व विजय शंकरसारखे खेळाडू चौथ्या गोलंदाजाची जागा भरुन काढू शकतात. त्यामुळे, आणखी स्पेशालिस्ट स्पीडस्टरची आवश्यकता भासली नाही. भुवनेश्वर कुमार पर्यायी मध्यमगती गोलंदाज असेल व जसप्रित बुमराह, मोहम्मद शमी बडय़ा सामन्यात जलद गोलंदाजीची मुख्य धुरा सांभाळतील, याचा निवड समितीने पुढे उल्लेख केला. नवदीप सैनी व खलील अहमद यांच्या नावावर चर्चा झाली. हे दोन्ही गोलंदाज संघासमवेत इंग्लंड दौऱयावर असतील आणि बुमराह, शमी, भुवनेश्वर यांच्यापैकी कोणी जायबंदी झाले तर त्यांचा समावेश करता येईल, अशी अपेक्षा सूत्रांनी व्यक्त केली.

 संघ : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, महेंद्रसिंग धोनी (यष्टिरक्षक), केदार जाधव, हार्दिक पंडय़ा, विजय शंकर, कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल, मोहम्मद शमी, जसप्रित बुमराह, भुवनेश्वर कुमार, दिनेश कार्तिक, रवींद्र जडेजा.

पदार्पणाच्या निकषावर दिनेश कार्तिक सर्वात जुना खेळाडू

आंतरराष्ट्रीय पदार्पणाच्या निकषावर दिनेश कार्तिक हा भारताचा संघातील सर्वात जुना खेळाडू ठरला आहे. त्याने महेंद्रसिंग धोनीच्या तीन महिने आधी सप्टेंबर 2007 मध्ये पदार्पण केले होते. 2007 च्या विश्वचषक स्पर्धेत भारताच्या पदरी दारुण अपयशाला सामोरे जावे लागले, त्यावेळी कार्तिक त्या संघात होता. पण, नंतर 2011 व 2015 मधील विश्वचषकासाठी त्याचा विचार झाला नव्हता. यंदा मात्र धोनी दुखापतग्रस्त झाल्यास त्याच्याऐवजी पर्यायी, भक्कम यष्टिरक्षक उपलब्ध असावा, यासाठी दिनेश कार्तिकला संघात संधी देण्यात आली आहे.

धोनी चौथा तर विराट कोहली तिसरा वर्ल्डकप खेळणार

यंदा धोनी आपला सलग चौथा वर्ल्डकप खेळणार असून विराट कोहली तिसऱयांदा विश्वचषकात आपले नशीब आजमावेल. विराटसाठी कर्णधार या नात्याने हा पहिलाच विश्वचषक असणार आहे. याशिवाय, रोहित शर्मा, शिखर धवन, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी व भुवनेश्वर कुमार यांचा 2015 आयसीसी विश्वचषक स्पर्धेतही समावेश होता.

विराट कोहलीचा ‘तो’ दावा अखेर खरा ठरला!

सध्या सुरु असलेल्या आयपीएल स्पर्धेतील प्रदर्शनाच्या निकषावर वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची निवड अजिबात होणार नाही, असे यापूर्वी विराट कोहलीने स्पष्ट केले होते. त्याचा तो दावा या निवडीत खरा ठरला. कारण, आयपीएलमध्ये दिनेश कार्तिकपेक्षा ऋषभ पंत अधिक बहरात असल्याचे पहिल्या टप्प्यात त्यांच्या आकडेवारीवरुन दिसून येते. पंतने या आयपीएल मोसमात आतापर्यंत 245 धावा जमवल्या आहेत तर दिनेश कार्तिकला मात्र 111 धावाच करता आल्या. अर्थात, 20 षटकांचे क्रिकेट व 50 षटकांचे क्रिकेट यात फरक असल्याने युवा पंतऐवजी अनुभवी कार्तिकला संधी देण्याचा निर्णय निवडकर्त्यांनी घेतल्याचे स्पष्ट झाले.

विराटसेनेसाठी विश्वचषकाची रुपरेषा

तारीख / सामना / भारतीय प्रमाणवेळ / ठिकाण

दि. 5 जून / भारत वि. द. आफ्रिका / दु. 3 वा. / साऊथम्प्टन /

दि. 9 जून / भारत वि. ऑस्ट्रेलिया / दु. 3 वा. / लंडन

दि. 13 जून / भारत वि. न्यूझीलंड / दु. 3 वा. / नॉटिंगहम

दि. 16 जून / भारत वि. पाकिस्तान / दु. 3 वा. / मँचेस्टर

दि. 22 जून / भारत वि. अफगाण / दु. 3 वा. / साऊथम्प्टन

दि. 27 जून / भारत वि. विंडीज / दु. 3 वा. / मँचेस्टर

दि. 30 जून / भारत वि. इंग्लंड / दु. 3 वा. / बर्मिंगहम

दि. 2 जुलै / भारत वि. बांगलादेश / दु. 3 वा. / बर्मिंगहम

दि. 6 जुलै / भारत वि. श्रीलंका / दु. 3 वा. / लीडस्