|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » निवडणुकीचा हिशेब देण्यासाठी उमेदारांची धावपळ

निवडणुकीचा हिशेब देण्यासाठी उमेदारांची धावपळ 

प्रतिनिधी/ बेळगाव

निवडणूक आयोगाने लादलेल्या जाचक अटींमुळे सर्वच उमेदवारांनी हिशेबाबत गांभीर्य घेतले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात ठाण मांडून असलेल्या हिशेब तपासणी पथकाकडे वारंवार आपला हिशेब देण्यासाठी उमेदवारांचे प्रतिनिधी आणि उमेदवार धावपळ करताना दिसू लागले आहेत. अप्परजिल्हाधिकारी एच. बी. बुदेप्पा आणि निवडणूक अधिकारी उमेदवाराच्या खर्चाची नोंद करुन घेत आहेत.

बेळगाव लोकसभा मतदार संघातील उमेदवारांच्या खर्चांचा लेखाजोखा जिल्हाधिकारी कार्यालयात तपासला जात आहे. उमेदवार हिशेब देत असताना त्याचे चित्रीकरणही करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील जुन्या सभागृहात हा हिशेब घेतला जात आहे. त्या ठिकाणी केवळ हिशेब देणाऱया उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींनाच प्रवेश दिला जात आहे. कोणत्या उमेदवाराने आतापर्यंत किती रक्कम खर्च केली आहे, याची माहिती देखील कोणालाच देण्यात येत नाही. केवळ त्याच्या नावावर खर्चाची नोंद केली जात आहे.

या सभागृहामध्ये जवळपास 15 हून अधिक निवडणूक कर्मचारी आणि एक अधिकारी ठाण मांडून आहेत. त्या ठिकाणी हा हिशेब घेतला जात आहे. आही अपक्ष उमेदवारांनी केवळ तीन ते चार हजार रुपये आतापर्यंत खर्च केले असल्याचा हिशेब दाखविण्यात आला आहे. उमेदवाराला 70 लाखांपर्यंत खर्च करण्याची मुभा निवडणूक आयोगाने निश्चित करुन दिली आहे. त्यामुळे राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार तेवढाच खर्च दाखविण्यासाठी प्रयत्न करु लागले आहेत. एकूणच निवडणूक आयोगाने खर्चाबाबत घेतलेली दक्षतेमुळे उमेदवारांना वारंवार जिल्हाधिकारी कार्यालयाकडे धावपळ करावी लागत आहे.