|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » शहापूर बसवाण्णा यात्रा संपन्न

शहापूर बसवाण्णा यात्रा संपन्न 

बेळगाव / प्रतिनिधी

शहापूर येथील ग्रामदैवत बसवाण्णा यात्रोत्सवाची मंगळवारी सांगता झाली. हर हर महादेवच्या गजरात इंगळय़ांचा कार्यक्रम पार पडला. इंगळय़ांनंतर रात्री उशीरापर्यंत यात्रा सुरू होती. प्रतिवर्षाप्रमाणे यावषीही हजारो भाविकांनी या यात्रोत्सवाला हजेरी लावली होती. शहापूर बरोबरच परिसरातील नागरिकांनी इंगळय़ांमधून धावून आपले नवस फेडले.

सोमवारी रात्री शहापूरच्या प्रमुख मार्गांवरून आंबील गाडे काढण्यात आले. मंगळवारी सकाळी इंगळय़ांसाठी आणलेल्या लाकडे पेटविण्यात आली. परंपरेनुसार सराफ गल्ली येथील सुणगार कुटुंबाने इंगळय़ा पेटविल्या. त्यानंतर खासबाग जोशी मळा येथून तांब्याचा मुखवटा व कोरे गल्ली येथील वाली यांच्या घरातून बाशिंग आणण्यात आले. त्यानंतर गणेशपूर गल्ली येथील रमेश तेरणी यांच्या घरापासून पालखी प्रदक्षिणेला प्रारंभ झाला.

जेड गल्ली, कोरे गल्ली, दानम्मा मंदिर तसेच इतर मंदिरांना भेटी देवून ही पालखी पुन्हा मंदिर परीसरात आली. इंगळय़ांना नैवेद्य दाखविल्यानंतर इंगळय़ांमधून नागरिकांनी धावण्यास सुरुवात केली. यामध्ये पुरुषांबरोबरच महिलांची संख्या लक्षणीय होती. हा इंगळय़ांचा कार्यक्रम पाहण्यासाठी संपूर्ण खडेबाजार परिसर गर्दीने फुलला होता.

इंगळय़ांनंतर मुख्य यात्रेला प्रारंभ झाला. मंदिर परिसरात खाद्य पदार्थांबरोबरच खेळणी तसेच इतर गृहोपयोगी साहित्यांचे स्टॉल मांडण्यात आले होते. खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत होती. यावषी दहा ते बारा हजार भाविकांनी या यात्रेला हजेरी लावल्याचे यात्रा कमिटीकडून सांगण्यात आले.