|Thursday, June 27, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » अर्थसंकल्पातील तरतुदींची अंमलबजावणी 25 मे नंतरच

अर्थसंकल्पातील तरतुदींची अंमलबजावणी 25 मे नंतरच 

प्रतिनिधी/ निपाणी

निपाणी शहर व उपनगरात मूलभूत सुविधांसह विविध विकासकामे राबवण्यासाठी 2019-20 या आर्थिक वर्षात नगरपालिकेने 27 कोटी 12 लाख रुपयांची तरतूद केली आहे. तितक्या रकमेचा अर्थसंकल्पच गेल्या महिन्यात जाहीर करण्यात आला. मात्र या अर्थसंकल्पातील तरतुदी पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणारा निधी खर्च करण्याची परवानगी ही 25 मे नंतरच म्हणजे लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर असणार आहे. त्यामुळे यंदा निपाणी पालिकेचे आर्थिक वर्ष एकप्रकारे आचारसंहितेनंतरच सुरू होणार आहे.

2019-20 च्या अर्थसंकल्पात प्रामुख्याने नगरपालिकेने रस्ते, पथदीप, गटारकामे व शौचालयासाठी 3 कोटी 10 लाख रुपयांची तरतूद केली आहे. घनकचरा तसेच पाणीपुरवठा विभागासाठी 8.84 कोटी तर मागासवर्गीयांच्या विकासासाठी सुमारे 80.44 लाखांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. पालिकेच्या म्युनिसिपल हायस्कूल इंग्लिश मिडियम शाळेसाठी मिळून 1.4 कोटीची तरतूद करण्यात आली आहे. तर राजा शिवछत्रपती सांस्कृतिक भवनासाठी 2 कोटी रुपये राखीव ठेवण्यात आले आहेत. सुमारे 9 लाख 60 हजार रुपये इतके शिल्लकी अंदाजपत्रक नगरपालिकेने गेल्या महिन्यात प्रशासक जिल्हाधिकाऱयांच्या मंजुरीने सादर केले.

मात्र त्यानंतर दोनच दिवसात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे सदर अर्थसंकल्पासाठी 1 एप्रिलपासून खर्चाचे नियोजन होते. मात्र 25 मे पर्यंत अर्थसंकल्पातील तरतुदी पूर्ण करण्यासाठी कर्मचारी, पगार, पाणीपुरवठा वगळता अन्य विकासकामांसाठी एक रुपयाही खर्च करण्याची परवानगी पालिकेला नाही. त्यामुळे यंदाच्या आर्थिक वर्षातील एप्रिल व मे हे दोन महिने निपाणी पालिकेकडून कोणतीही विकासकामे होणार नाहीत.