|Monday, August 26, 2019
You are here: Home » Top News » गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांची तात्काळ चौकशी करावी

गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांची तात्काळ चौकशी करावी 

काँग्रेसची लोकायुक्तांकडे मागणी  

ऑनलाईन टीम / मुंबई :

गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी ताडदेव, मुंबई येथील एम. पी. मिल झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प प्रकरणी विकासकाला लाभदायी ठरेल, असा निर्णय घेतला. हे प्रकरण काँग्रेस पक्षाने उघड केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी ऑगस्ट 2017 मध्ये लोकायुक्तांकडे चौकशी सोपविली होती. पण अद्याप या प्रकरणी निकाल आला नाही. तो तात्काळ द्यावा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत लोकायुक्तांना पत्र लिहून केली आहे.

ऑक्टोबर 2018 ला या प्रकरणाची लोकायुक्त कार्यालयात शेवटची सुनावणी झाली होती असे समजते. या प्रकरणाची चौकशी करण्याकरिता लोकायुक्त कार्यालयात संपर्क केला असता हे प्रकरण अतिशय गोपनीय असून या संदर्भातील माहिती केवळ लोकायुक्तांच्याच कक्षात उपलब्ध आहे, असे सांगितले गेले. या संदर्भात चौकशी सुरु होऊन दोन वर्ष होत आली व सुनावणी होऊन सहा महिने झाले पण अद्याप निर्णय आलेला नाही. महाराष्ट्र तसेच देशातील जनतेचे या प्रकरणाकडे लक्ष लागून असल्याने आपण लवकरात लवकर निकाल द्यावा आणि या प्रकरणातील गोपनीयतेवरून पडदा उठवावा ही अपेक्षा अपेक्षा आहे असे सावंत यांनी म्हटले आहे.