|Monday, August 26, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » काश्मीरमधील दगडफेकीत होतेय घट

काश्मीरमधील दगडफेकीत होतेय घट 

श्रीनगर  / वृत्तसंस्था :

जम्मू आणि काश्मीरमध्ये दगडफेकीच्या घटनांमध्ये घट झाली आहे. पण लोक स्वतःचा विरोध व्यक्त करण्यासाठी नागरी निदर्शनांचा मार्ग अवलंबत असल्याचा खुलासा सैन्याच्या अंतर्गत अहवालाद्वारे झाला आहे. तीन दिवस चाललेल्या सैन्य कमांडर्स परिषदेत सैन्याच्या वरिष्ठ अधिकाऱयांनी यावर चर्चा केली आहे.

सैन्याच्या अंतर्गत अहवालानुसार मागील वर्षी ऑगस्ट महिन्यापासून काश्मीर खोऱयातील दगडफेकीच्या घटनांमध्ये घट झाली आहे. ऑगस्ट महिन्यात दगडफेकीच्या 66 घटना झाल्या होत्या, तर मार्च महिन्यात अशाप्रकारच्या केवळ 17 घटना घडल्या आहेत. खोऱयातील लोक नागरी निदर्शनांच्या माध्यमातून स्वतःचा विरोध व्यक्त करत आहेत. मार्च महिन्यात अशाप्रकारची 69 निदर्शने झाल्याचे अहवालाद्वारे समजते.

केंद्रीय तपास यंत्रणांनी फुटिरवाद्यांवर धडक कारवाई करत हवालाच्या माध्यमातून होणारा वित्तपुरवठा रोखल्याने दगडफेकीच्या घटना कमी झाल्याचे मानले जात आहे. अनेक फुटिरवादी म्होरके सध्या तुरुंगात असून त्यांच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच त्यांचे आर्थिक व्यवहार तपासले जात असल्याने पाकिस्तानातून येणारा पैशांचा ओघ आटला आहे.

हिंसाचाराची तीव्रता कमी

दहशतवाद्यांच्या विरोधातील मोहिमेदरम्यान लोकांकडून होणाऱया निदर्शनांची तीव्रता देखील कमी झाल्याचे सैन्य कमांडर्स परिषदेतील चर्चेदरम्यान सांगण्यात आले. दहशतवादाच्या मार्गावर जाणाऱया तरुणांची संख्या घटली असून दहशतवाद्यांची स्थानिक भरती आता केवळ दक्षिण काश्मीरपुरती मर्यादित राहिल्याचे समोर आले आहे.

दहशतवाद्यांमध्ये घट

काश्मीर खोऱयात जानेवारीमध्ये 5, फेबुवारीमध्ये 7 आणि मार्च महिन्यात 6 तरुणांनी दहशतवादाचा मार्ग पत्करला होता. या 6 जणांपैकी 6 जण दक्षिण काश्मीरचे असून एक बांदीपोराचा रहिवासी आहे. मागील वर्षाच्या पहिल्या 3 महिन्यांमध्ये 32 तरुणांनी दहशतवादाचा मार्ग निवडला होता.

यंदा 68 दहशतवाद्यांचा खात्मा

खोऱयात यंदा आतापर्यंत 68 दहशतवादी मारले गेले आहेत. मार्च महिन्यात 21 दहशतवादी मारले गेले होते, ज्यातील 11 जण जैश-ए-मोहम्मदचे, 5 हिजबुल मुजाहिदीनचे तर 5 जण लष्कर-ए-तोयबाचे होते. पुलवामा येथील हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांच्या विरोधात धडक कारवाई सुरू केली असून यात मोठे यश देखील मिळाले आहे.