|Monday, August 26, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » भाजप आमदाराच्या हत्येचा सूत्रधार ठार

भाजप आमदाराच्या हत्येचा सूत्रधार ठार 

वृत्तसंस्था /दंतेवाडा  :

छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये सुरक्षा दलांनी गुरुवारी झालेल्या चकमकीत दोन नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले आहे. मारले गेलेल्या नक्षलींमध्ये भाजप आमदार भीमा मंडावी यांच्या हत्येचा सूत्रधार सामील आहे.

नक्षली एसीएम वर्गिसवर 5 लाख रुपयांचे इनाम होते. मृत नक्षलींकडून शस्त्रास्त्रs हस्तगत करण्यात आली आहेत. 9 एप्रिल रोजी याच भागात नक्षलींनी मंडावी यांच्या ताफ्यावर आयईडीने हल्ला केला होता. या हल्ल्यात मंडावी आणि त्यांच्या चालकाचा मृत्यू झाला होता. तर 3 जवान हुतात्मा झाले होते.

सुरक्षा दलाचे सदस्य गुरुवारी सकाळी गस्त मोहिमेवर असताना काटेकल्याण आणि कोंडादरम्यानच्या दौलिकडका जंगलांमध्ये नक्षलींनी गोळीबार सुरू केला होता. प्रत्युत्तरादाखलच्या कारवाईत नक्षली कमांडर वर्गिस आणि लिंगा हे मारले गेले तर एकाला अटक करण्यात आली आहे. नक्षली कमांडर्स असलेला वर्गिस अनेक हल्ल्यांचा सूत्रधार राहिला आहे.  मंडावी यांच्यावर हल्ला झालेले ठिकाण मालांगीरमध्ये मोडते आणि मालांगीर एरिया कमिटीचा वर्गिस हा सदस्य होता.

प्रचारातून परतत होते आमदार

भाजप आमदार मंडावी यांची 9 एप्रिल रोजी कुआंकोंडा क्षेत्रात हत्या झाली होती. हा पूर्ण भाग मालांगीर नक्षल एरिया कमिटी अंतर्गत येतो. मंडावी यांच्या ताफ्याला लक्ष्य करत स्फोट घडविणाऱया नक्षलींमध्ये मालांगीर कमिटीचाही हात होता.