|Monday, August 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » लाखो भाविकांच्या उपस्थितीत जोतिबा यात्रा

लाखो भाविकांच्या उपस्थितीत जोतिबा यात्रा 

विनोद चिखलकर /जोतिबा डोंगर :

दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाची चैत्र पौर्णिमा यात्रेसाठी लाखो भाविक, असंख्य सासनकाठय़ा व त्यांचे प्रचंड वाहने जोतिबा डोंगरावर दाखल झाले आहेत. संपूर्ण भारतभरातून आलेल्या या भाविकांच्या उपस्थितीत चांगभलंच्या अखंड गजरात व गुलाल खोबऱयाच्या उधळणीत उद्या चैत्र यात्रेचा अभूतपूर्व सोहळा होत आहे. अजूनही भाविक भक्त मोठय़ा संख्येने डोंगरावर दाखल होत आहेत.

‘जोतिबाच्या नावानं’ व केदारनाथाच्या नावानं चांगभलंचा अखंड गजर, हलगी पिपानी, सनई, ढोलाच्या तालावर सासनकाठी नाचवणारे भाविक आणि ‘श्रीं’च्या दर्शनासाठी अखंडपणे सुरू असलेली भक्तांची रीघ यामुळे जोतिबा डोंगर गजबजला आहे. श्री जोतिबा देवाची  चैत्र महायात्रा शुक्रवार दि. 19 एप्रिलला होत आहे. भक्तजनांनी जोतिबा डोंगर फुलला असून, यात्रेदरम्यान अनुचित प्रकार घडू नये म्हणून शासकीय यंत्रणा सक्रीय झाली आहे. अंदाजे ‘सात’ लाख  भाविक यात्रेसाठी उपस्थितीत राहण्याची शक्यता आहे. गावाच्या सर्व सासनकाठय़ा डोंगरावर विराजमान झाल्या आहेत.

महाराष्ट्रातील प्रमुख मोठय़ा यात्रांमध्ये गणल्या जात असलेल्या श्री जोतिबा देवाच्या चैत्र यात्रेसाठी, जोतिबा डोंगरावर गुरूवारीच भाविकांची मांदियाळी जमली आहे. उन्हाच्या कडाक्यात सहा ते सात पदरी भाविकांच्या रांगा दर्शनसाठी लागल्या होत्या. तर मुख्य यात्रेसाठी थांबलेल्या भाविकांनी दक्षिण दरवाजा परिसर,  यमाई मंदिर, चव्हाण तळे व डोंगर परिसरात जागा मिळेल तिथे सासनकाठय़ांसह मुक्काम टाकला आहे. या भक्तांना ओढ लागली आहे. ती यात्रेच्या मुख्य दिवसाची.

भारतातील नामवंत यात्रेप्रमाणेच जोतिबा यात्रेसाठी येणाऱया भाविकांचे वैशिष्टय़ मानले जाते. लाखो भाविक, शेकडो बैलगाडय़ा, चांगभलंचा अखंड गजर, हलगी, पिपाणी, ढोल ताशांच्या निनादात तल्लीन होऊन सासन काठय़ा नाचवणारे भाविक, त्याचप्रमाणे काही भाविक चालत दंडस्नान करत येत असतात तर खासगी वाहनातून येणारे लाखो भाविक तर एस. टी. च्या सतत सुरू असलेल्या फेऱया यामुळे भाविकांची डोंगर परिसरात होणारी तुफान गर्दी. या गर्दीत प्रत्येकाचे नियोजनबद्ध काम सुरू असते. लहानांपासून थोरापर्यंत व महिला वर्ग या गर्दीत सहभागी झालेला असतो. सर्वांची आस एकच श्रींच्या चरणाचे दर्शन व गुलाल खोबऱयाची उधळण, पालखी सोहळा, धुपारती सोहळा, सासन काठी सोहळा डोळे भरून पहायचा. यावेळी पुरण पोळीचा नैवेद्य करून ‘श्री’स दाखवून  प्रसाद घेणे हे प्रामुख्याने केले जाते.  या चैत्र यात्रेसाठी संपूर्ण डोंगर परिसर  सज्ज झाला आहे. पोलिसांचा बंदोबस्त मोठय़ा प्रमाणात तैनात केला आहे. भाविकांसाठी पाणपोई, आरोग्य, स्वच्छता, अन्नछत्र, पार्किंगची व्यवस्था, शौचालय, अनेक ठिकाणी हायमास्टदिवे लावले आहेत. तसेच मंदिरात जनरेटर, सीसीटीव्ही कॅमेरे स्कीन बसवलेले आहेत. तसेच पालखी मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे, थेट प्रक्षेपणासाठी सोय केली आहे.

यात्रेच्या बंदोबस्तासाठी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी मोठा बंदोबस्त मागवला आहे. अप्पर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे, पन्हाळा, शाहूवाडीचे पोलीस उपअधीक्षक आर. आर. पाटील व कोडोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजू झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवला आहे. पोलीस अधीक्षक 1, अप्पर पोलीस अधीक्षक 2, पोलीस उपअधीक्षक 6, पोलीस निरीक्षक 19, सहाय्यक पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षक  73, वाहतूक पोलीस 40, कॉन्स्टेबल 800, होमगार्ड 1000 तसेच एसआरपीएफच्या 2 तुकडय़ा, डॉग स्कार्ड पथक, क्रेन व्हॅन व व्हाईट आर्मीची 1 तुकडी असा बंदोबस्त तैनात आहे.   भाविकांच्या सोयीसाठी एस. टी. महामंडळाने मध्यवर्ती बसस्थानक, पंचगंगा घाट, रंकाळा बसस्थानक येथून थेट जोतिबा डोंगरावर 150 बसेसची सोय केली आहे. दर दहा मिनिटाला एक बस असणार आहे. तसेच कराड, सातारा, पंढरपूर, बेळगाव, सोलापूर आदी ठिकाणी जाण्यासाठी थेट बसेसची सोय केली आहे. तसेच कोल्हापूर महानगरपालिकेच्या के. एम. टी. बसेसची सतत सोय केली आहे. जोतिबाकडे जाणारे सर्व वाहने केर्ली पांजरपोळ, कुशिरेमार्गे जातील तर परत येताना वाहने दानेवाडी वाघबीळ मार्गे उतरतील. तसेच यमाई ते गिरोली  हा मार्ग देखील चालू राहील.