|Monday, August 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » जवानांना बदनाम करणाऱयांना धडा शिकवा

जवानांना बदनाम करणाऱयांना धडा शिकवा 

प्रतिनिधी/वार्ताहर /चिकोडी/निपाणी :

काँग्रेस व निजद युतीच्या नेत्यांना व्होट बँकेतच अधिकचे स्वारस्य आहे. त्यांना जनतेचे हित व राष्ट्राचे भवितव्य यात कोणताच रस नाही. म्हणून विरोधक राष्ट्रवादाला विरोध करताना वंशवाद, भ्रष्टाचार, आतंकवाद याचे समर्थन करू लागले आहेत. सीमेवर प्राणांची आहुती देत देशाचे संरक्षण करणाऱया जवानांचा अपमान करण्यातही ते मागे पुढे पहात नाहीत. अशा या विरोधकांना लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून सार्वजनिक जीवनातून कायमचे हटवा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

चिकोडी येथे बी. के. कॉलेज समोरील खुल्या मैदानावर गुरुवारी चिकोडी व बेळगाव लोकसभा क्षेत्राचे भाजप उमेदवार आण्णासाहेब जोल्ले व सुरेश अंगडी यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित भाजप कार्यकर्ते, महिला मतदार यांच्यासमोर ते बोलत होते. प्रारंभी आमदार महांतेश कवटगीमठ यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले, देशात भाजपचे व मोदी सरकारचे वारे वाहू लागले आहे. हे वारे कसे आहे हे वातानुकूलीत खोलीमध्ये बसून राजकारण करणाऱयांना कधीच कळणार नाही. ते वारे पहायचे असेल तर विरोधकांनी वातानुकूलीत खोलीतून बाहेर पडून चिकोडीत यावे. त्यांना सर्वकाही समजेलच. पण त्याचबरोबर अनुभवायलाही मिळेल. काँग्रेसचे गटबंधन म्हणजे एक मिलावट आहे. ही मिलावट सध्या भारतीय संस्कृती व परंपरेस बदनाम करण्यात मग्न आहे. या महागठबंधनाद्वारे सेनेचे अधिकार कवच काढून घेण्याबरोबरच खोटे आरोप करून दहशतवादाला पाठबळ देण्याचे षड्यंत्र रचले जात आहे.

कर्नाटकातील निजद व काँग्रेसच्या युती सरकारने केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान योजनेसाठी शेतकऱयांची नावे पाठविली नसल्याने हे लोक शेतकऱयांचा अधिकार बळकावत आहेत. पण शेतकऱयांच्या हक्क बळकावणाऱयांना आपण सोडणार नाही. 23 मे ला निकाल येताच पै न् पै शेतकऱयांच्या खात्यावर जमा करणार, असे त्यांनी सांगितले.

काँग्रेसच्या नेतृत्वातील महागठबंधनातील नेते सध्या केवळ चारच कामात मग्न आहेत. ते म्हणजे राष्ट्रवादास विरोध, वंशवादास समर्थन, भ्रष्टाचारच शिष्टाचार समजणे व मोदींना शिव्या देणे, अशा या लोकांकडे दुसरे मुद्देच नसल्याने ते हताश झाल्याचीही टीका त्यांनी केली. आपण चिकोडीत दुसऱयांदा आलो आहोत. पहिल्यांदा विधानसभेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षासाठी आलो होतो. तर आता मी माझ्यासाठी आलो आहे. यासाठी आपले प्रत्येक मत कमळावर द्यावे ते थेट माझ्या खात्यावर जमा होईल, असे मोदी म्हणाले.

भाजपचे सरकार शेतकऱयांचे उत्पन्न दुप्पट, मध्यमवर्गीयां आर्थिकस्तर सुधारणे व सर्वसामान्य गरिबांच्या हितासाठी महागाईवर नियंत्रण करण्यावर भर देणार आहे, असे सांगितले. भाजपद्वारे यापुढेही राष्ट्रवाद व राष्ट्रसंरक्षणावर भर देण्याबरोबरच 60 वर्षावरील शेतकऱयांना पेन्शन, किसान सन्मान योजना आदीवर भर देणार आहे. चिकोडी व बेळगाव लोकसभा क्षेत्रास पाच नद्यांचे वरदान लाभून देखील येथील शेतकऱयांना पाण्याअभावी झगडावे लागते. गत पाच वर्षाच्या कालावधीत आपल्या सरकारने विजेचा प्रश्न मार्गी लावला. आता यावेळी पाणीपुरवठय़ावर काम करण्याबरोबरच मुलांना शिक्षण, युवकांना रोजगार, ज्येष्ठांना औषधे, सदृढ व सशक्त भारत निर्मिती या पंचसुत्रावर कार्य करू, असे सांगितले.