|Monday, August 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » गोवा फॉरवर्ड, अपक्षांचा भाजप उमेदवारांना पाठिंबा

गोवा फॉरवर्ड, अपक्षांचा भाजप उमेदवारांना पाठिंबा 

प्रतिनिधी /पणजी :

नॅशनल डमोक्रेटीक अलायन्सचे (एनडीए) अर्थात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे गोव्यातील घटक पक्ष गोवा फॉरवर्ड तसेच इतर अपक्ष आमदारांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत भाजप उमेदवारांना पाठिंबा दर्शवून त्यांना निवडून देण्याचे आवाहन केले. साधन – सुविधा आणि मानवी विकासासाठी सरकार कटिबद्ध असून मनोहर पर्रीकरांचे स्वप्ने पूर्ण करण्याकरीता झटणार असल्याचे डॉ. सावंत म्हणाले. गोव्यातील 2 लोकसभा व 4 विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप विजयी होणार असल्याचा दावा त्यांनी केला.

पणजीत एनडीएतर्फे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. सावंत यांनी सांगितले की, काँग्रेस पक्ष वैफल्यग्रस्त झाला असून निवडणुकीचा दिवस जवळ आले तरी त्यांचा एकही राष्ट्रीय नेता गोव्याकडे प्रचारासाठी फिरकलेला नाही. त्यामुळे काँग्रेसचे राष्ट्रीय नेते गोव्याला आणि गोव्यातील काँग्रेस नेत्यांना काय किंमत देतात ते स्पष्टपणे दिसते. याऊलट भाजपचे केंद्रातील नेते गोव्याला विशेष किंमत देतात तसेच ते येथे येऊन पक्षासाठी प्रचार करतात. केंद्रात भाजपचे सरकार असल्याने गोव्याला भरपूर निधी मिळाला, परंतु काँग्रेसच्या काळात मात्र काहीच मिळाले नाही याकडे डॉ. सावंत यांनी लक्ष वेधले.

काँग्रेसने 70 वर्षापेक्षा जास्त काळ सत्ता भोगली, परंतु जनतेला मात्र कधीच न्याय दिला नाही. फक्त गरिबी हटावचे नारे दिले परंतु गरिबी हटली नाही तर तशीच राहिली आणि आताही काँग्रेस पक्ष पुन्हा सुशासनासह तोच नारा पुन्हा देत आहेत. जनतेने त्यास बळी पडू नये. भाजप हा सर्वधर्म समभावी पक्ष आहे आणि सर्वांना या पक्षाने आता समावून घेतले आहे. हा पक्ष म्हणजे समतेचे प्रतिक आहे. कोणी काँग्रेस पक्षात गेला म्हणून भाजपला काही फरक पडत नाही, असेही डॉ. सावंत यांनी स्पष्ट केले.

अपक्ष आमदार महसूलमंत्री रोहन खंवटे, कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे, गोवा फॉरवर्डचे आमदार व ग्रामीण विकासमंत्री जयेश साळगांवकर हे पत्रकार परिषदेला उपस्थित होते. त्यांनी लोकसभा तसेच विधानसभा पोटनिवडणुकीतील सर्व भाजप उमेदवारांना समर्थन जाहीर केले आणि त्यांना विजयी करण्यासाठी सर्वांनी हातभार लावावा, असे आवाहन केले. मंत्री विजय सरदेसाई व मंत्री विनोद पालयेकर हजर नव्हते.