|Sunday, June 16, 2019
You are here: Home » उद्योग » विमानातील वायफायसाठी जिओचेही प्रयत्न!

विमानातील वायफायसाठी जिओचेही प्रयत्न! 

दूरसंचार मंत्रालयाकडे अर्ज सादर : प्रवासादरम्यान वायफाय सेवेच्या अधिकाराची मागणी

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

विमान प्रवासादरम्यान प्रवाशांना देण्यात येणाऱया प्रस्तावित वायफाय सेवेचे अधिकार मागणी करणारा अर्ज रिलायन्स जिओ इन्फोकॉमने केंद्रीय दूरसंचार मंत्रालयाकडे सादर केला आहे. त्याचबरोबर ऑर्टस कम्युनिकेशन्स, स्टेशन सॅटकॉम आणि क्लाऊड कास्ट डिजिटल या कंपन्याही यासाठी प्रयत्न करत आहेत.

विमान प्रवासादरम्यान प्रवाशांना इंटरनेट सेवेचा लाभ घेता यावा यासाठी केंद्र सरकारने सध्याच्या धोरणात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी गतवर्षी डिसेंबरमध्ये सरकारकडून एक अधिसूचना काढण्यात आली होती. या अधिसूचनेनुसार भारती एअरटेल, हगेस कम्युनिकेशन्स इंडिया आणि टाटानेट सर्व्हिसेस या कंपन्यांनी परवाना मिळण्यासाठीही अर्ज दाखल केले आहेत. दूरसंचार मंत्रालयाने फेब्रुवारीत सर्वात अगोदर हगेस कम्युनिकेशन्सला परवाना दिला. त्यानंतर टाटानेट, भारती एअरटेल या कंपन्यांनाही हा परवाना मिळाला आहे.

सोशल मीडिया सर्फिंगसह व्हिडीओ मूव्हिज स्ट्रीमिंगचा लाभ

विमानप्रवाशांसाठी बहुप्रतिक्षीत असणारी ही सेवा चालू वर्षाच्या उत्तरार्धापासून सुरू होण्याची शक्यता आहे. यासाठी अंतरीम मंजुरी मिळाल्यानंतर आवश्यक पायाभूत सुविधांची उभारणी झाल्यावर काही महिन्यांत ही सेवा सुरू होणार आहे. या सुविधेमुळे प्रवाशांना प्रवासादरम्यान सोशल मीडिया सर्फिंगसह व्हिडीओ मूव्हिज स्ट्रीमिंगचा लाभ घेता येइल.