|Monday, August 26, 2019
You are here: Home » क्रिडा » स्कॉटलंडचा अष्टपैलू कॉन डी लँजचे निधन

स्कॉटलंडचा अष्टपैलू कॉन डी लँजचे निधन 

वृत्तसंस्था/ स्कॉटलंड

स्कॉटलंडचा 38 वर्षीय अष्टपैलू क्रिकेटपटू कॉन डी लँजचे निधन झाले. बऱयाच कालावधीपासून बेन टय़ुमरशी त्याचा संघर्ष सुरू होता. स्कॉटलंड क्रिकेटने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्याच्या पश्चात पत्नी क्लेअर व डेझी व रोरी अशी दोन अपत्ये आहेत.

‘गुरुवारी रात्री उशिरा कॉन डी लँज या क्रिकेटपटूचे दुखद निधन झाले आहे. स्कॉटलंडसाठी आणि क्रिकेटसाठी त्याने मोठे योगदान दिले असून या दुखद प्रसंगी आम्ही त्याच्या कुटुंबियांसमवेत आहोत,’ असे ट्विट त्यांनी केले आहे. दक्षिण आफ्रिकेत जन्मलेल्या कॉन डी लँजने स्कॉटलंडतर्फे 21 आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून जून 2015 मध्ये त्याने आयर्लंडविरुद्धच्या टी-20 सामन्यात आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. यानंतर तो संघाचा मध्यफळीतील नियमित सदस्य झाला होता. डावखुरा स्पिनर असलेल्या डी लँजने झिम्बाब्वेविरुद्ध 60 धावांत 5 बळी ही सर्वोत्तम कामगिरी नोंदवली होती आणि पूर्ण सदस्य असलेल्या संघावर स्कॉटलंडला पहिला वनडे विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता. आणखी पाच सामने खेळल्यानंतर 2017 च्या अखेरीस प्रकृती अस्वास्थ्यामुळे तो बाजूला पडला. त्यानंतर त्याला ब्रेन टय़ुमर झाल्याचे तपासणीत निष्पन्न झाले. ऑक्टोबर 2018 मध्ये त्याच्या कुटुंबियांनी त्याचा आजारपणाची जाहीर माहिती दिली आणि त्याच्यासाठी निधी जमा करण्याची मोहिम सुरू केली होती. त्याच्या निधनाबद्दल क्रिकेट स्कॉटलंडचे अध्यक्ष टोनी ब्रायन यांनी दुःख व्यक्त केले आहे.