|Monday, August 26, 2019
You are here: Home » क्रिडा » बेल्जियम कनिष्ठ टेटे स्पर्धेत भारताच्या शाह-रीगनला कांस्य

बेल्जियम कनिष्ठ टेटे स्पर्धेत भारताच्या शाह-रीगनला कांस्य 

वृत्तसंस्था/ स्पा, बेल्जियम

भारताच्या मानुश शाह व रीगन अल्बुकर्क यांनी येथे झालेल्या आयटीटीएफ ज्युनियर सर्किट प्रिमियम टेबल टेनिस स्पर्धेत ज्युनियर व खुल्या कॅडेट गटात कांस्यपदक पटकावले.

या दोघांनी इराणच्या अमिन अहमदियन व रादिन खय्याम यांच्यासमवेत जोडी जमवित मुलांच्या कनिष्ठ विभागात पदके मिळविली. या इंडो-इराणी संघाची स्थानिक खेळाडू ऍड्रियन रासेनफॉस, निकोलस डेग्रोस व ओलाव कोसोलोस्की यांच्याविरुद्ध सुरुवात मात्र चांगली झाली नाही. इराणच्या अमिन अहमददियनला पहिल्या सामन्यात ऍड्रियनकडून 0-3 असा पराभव स्वीकारावा लागला. पण मानुश शाहने ओलाव कोसोलोस्कीवर 3-1 अशी मात करून 1-1 अशी बरोबरी साधली. रीगनला हा जोम टिकविता आली नाही आणि त्याला निकोलस डेगेसकडून 1-3 असा पराभव स्वीकारावा लागला. नंतर जागतिक 21 व्या मानांकित मानुशने जिगरबाज खेळ करीत ऍड्रियन रासेनफॉसवर 3-1 असा आणखी एक शानदार विजय मिळवित बरोबरी साधून दिली. निर्णायक पाचव्या सामन्यात इराणच्या अमिनने ओलावरवर 3-2 असा चुरशीचा विजय मिळवित उपांत्य फेरीत स्थान मिळवून दिले.

उपांत्य फेरीत भारत व इराणच्या मिश्र संघाला जपानचे रायोइची योशियामा, ताकेरु काशिवा आणि न्यूझीलंडचा नाथन झु यांच्याशी मुकाबला करावा लागला. भारत-इराण संघाने जोरदार संघर्ष केला. पण त्यांना 0-3 असा पराभव स्वीकारावा लागल्याने कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.