|Monday, August 26, 2019
You are here: Home » क्रिडा » दीपक, रोहित टोकस दुसऱया फेरीत

दीपक, रोहित टोकस दुसऱया फेरीत 

आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिप : महिलांत सोनिया चहल उपांत्यपूर्व फेरीत

वृत्तसंस्था/ बँकॉक

येथे सुरु असलेल्या आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या दीपक कुमार (49 किलो), रोहित टोकस (64 किलो), आशिष (69) किलो यांनी दुसऱया फेरीत प्रवेश केला आहे. पहिल्याच फेरीत पाच भारतीय बॉक्सरना पुढे चाल मिळाली असून त्यांनी देखील दुसरी फेरी गाठली आहे.

शुक्रवारी झालेल्या सलामीच्या लढतीत राष्ट्रीय चॅम्पियन व स्टार बॉक्सर दीपक कुमारने 49 किलो गटात व्हिएतनामच्या लुई काँगचा 5-0 असा एकतर्फी धुव्वा उडवला. सुरुवातीपासून आक्रमक खेळणाऱया दीपकने प्रतिस्पर्धी काँगला या लढतीत जराही वरचढ होण्याची संधी दिली नाही. या विजयासह दीपकने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. याशिवाय, 64 किलो गटात भारताच्या रोहित टोकसनेदेखील शानदार विजयासह पुढील फेरी गाठली. रोहितने तैवानच्या चुई येनचा 5-0 असा पराभव केला. तसेच अन्य एका लढतीत 69 किलो गटात आशिषने विजयी प्रारंभ करताना कॅमरुनच्या सोपोर्सचा 5-0 असा धुव्वा उडवला.

महिला गटात भारताची दिग्गज महिला बॉक्सर सोनिया चहलने 57 किलो गटात व्हिएतनामच्या उयानचा एकतर्फी पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. तत्पूर्वी, सोनियाला पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली होती. आता, उपांत्यपूर्व फेरीत सोनियासमोर थायलंडच्या रेनीकचे आव्हान असणार आहे.