|Monday, August 26, 2019
You are here: Home » क्रिडा » लॅजोव्हिक, मेल्डेडेव्ह उपांत्य फेरीत

लॅजोव्हिक, मेल्डेडेव्ह उपांत्य फेरीत 

माँटे कार्लो मास्टर्स टेनिस स्पर्धा : नादालही उपांत्यपूर्व फेरीत दाखल, ज्योकोव्हिकला पराभवाचा धक्का

वृत्तसंस्था/ माँटे कार्लो

येथे सुरू असलेल्या माँटे कार्लो मास्टर्स पुरूषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत रशियाच्या डॅनियल मेल्डेडेव्ह व सर्बियाच्या दुसॅन लॅजोव्हिकने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. स्पेनचा माजी टॉप सीडेड राफेल नादालनेही विजयी आगेकूच कायम ठेवताना अंतिम 16 मधील स्थान निश्चित केले आहे. बल्गेरियाचा अव्वल खेळाडू डिमिट्रोव्ह व ऑस्ट्रेलियाच्या डॉमनिक थिएम यांना मात्र दुसऱयाच फेरीत धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला.

  शुक्रवारी झालेल्या उपांत्यपूर्व लढतीत रशियाच्या डॅनियल मेल्डेडेव्हने सर्बियाचा दिग्गज खेळाडू नोव्हॅक ज्योकोव्हिकला 6-3, 4-6, 6-2 असे पराभूत करत स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखवला. 75 मिनिटे चाललेल्या या लढतीत मेल्डेडेव्हने शानदार खेळाचे प्रदर्शन करताना ज्योकोव्हिकला चांगलाच दणका दिला. पहिला सेट जिंकत मेल्डेडेव्हने दमदार सुरुवात केली होती पण ज्योकोव्हिकने दुसरा सेट जिंकत 1-1 अशी बरोबरी साधली. यानंतर मेल्डेडेव्हने तिसरा सेट 6-2 असा जिंकला व उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले. याशिवाय अन्य एका लढतीत सर्बियाच्या दुसॅन लॅजोव्हिकने इटलीच्या लॉरेज सोनेगोचा 6-4, 7-5 असे नमवत उपांत्य फेरी गाठली आहे. आता, उपांत्य फेरीत मेल्डेडेव्हसमोर लॅजोव्हिकचे आव्हान असणार आहे.

 स्पेनच्या नादालची विजयी आगेकूच

गुरुवारी रात्री झालेल्या दुसऱया फेरीतील सामन्यात नादालने बल्गेरियाच्या डिमिट्रोव्हला 6-4, 6-1 असा पराभवाचा धक्का दिला. या विजयासह नादालने उपांत्यपूर्व फेरी गाठली असून त्याची पुढील लढत आता अर्जेन्टिनाच्या गॉडिओ पेलाशी होईल. प्रारंभापासूनच नादालने आक्रमक खेळताना डिमिट्रोव्हला शेवटपर्यंत जराही वर्चस्वाची संधी दिली नाही. पहिला सेट नादालने 6-4 असा जिंकल्यानंतर दुसऱया सेटमध्ये डिमिट्रोव्हकडून प्रतिकाराची अपेक्षा होती पण हा सेटही नादालने एकतर्फी जिंकत पुढील फेरीत प्रवेश केला. विशेष म्हणजे, नादालने आतापर्यंत 11 वेळा या स्पर्धेचे जेतेपद पटकावले आहे. तसेच दुसऱया एका सामन्यात इटलीच्या फॅबिओ फॉगनेनीने जर्मनीच्या ऍलेक्झांडर व्हेरव्हला 7-6, 6-1 असे, क्रोएशियाच्या बोर्ना कोरिकने फ्रान्सच्या हेर्बटला 6-4, 6-2 असे नमवत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.