|Monday, August 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » ‘मॉर्निंग’ वॉक मध्ये ‘व्होटर्स’ टॉक

‘मॉर्निंग’ वॉक मध्ये ‘व्होटर्स’ टॉक 

बाळासाहेब उबाळे / कोल्हापूर

कोल्हापूरच्या विकासासाठी काय केले आणि भविष्यात काय करायला पाहिजे असे मुद्दे घेऊन उमेदवारांचे कार्यकर्ते मतदारांपर्यंत पोहाचत आहेत. संधी मिळेल त्याठिकाणी प्रचार सुरु आहे. सकाळी फिरायला जाणाऱया नागरिकांशीही आता संवाद साधून मतदान करण्याचे आवाहन केले जात असल्याचे चित्र शहराच्या विविध भागात आहे.

लोकसभा निवडणूकीचा प्रचार दुसऱया टप्यात पोहोचला आहे. मिसळ, कटवडा खात, लस्सी पित मतदारांसोबत संवाद साधून उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून मतदान करण्याचे आवाहन केले जात आहे. थोरा मोठय़ांचा आदर करत त्यांच्यासमोर झोळी पसरत मताची मागणी केली जात आहे. जोडीला भविष्यात विकास करण्याचे स्वप्न दाखवले जात आहे. मतदारांना भेटण्याची एकही संधी दवडली जात नाही.

सर्वच मतदार दिवसभर भेटत नाहीत. मात्र सकाळी फिरायला जाणारा शहरात मोठा वर्ग आहे. शिवाजी विद्यापीठ, रंकाळा, सर्किट हाऊस, सार्वजनिक बागा, ओपन जीममध्ये सकाळी मोठी गर्दी असते. यामुळे उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून पहाटेच्यावेळीच याठिकाणी फिरायला येणाऱयांना गाठले जात आहे. काका, काकी, दादा, ताई,मामा, सर म्हणत प्रसंगी कोठून तरी जुनी ओळख काढत त्यांच्यासमोर हात जोडले जात आहेत. प्रसंगी एखादे गुलाबाचे फूल देवून हसमुखाने त्यांचे स्वागत केले जात आहे. काका मला ओळखले का? मी लोकसभेचा उमेदवार आहे. लक्षात असू द्या, आपल्याला कोल्हापूरचा विकास करायचा आहे आणि त्यासाठी तुमच्या लाखमोलाच्या मताची गरज अशा विनवण्या केल्या जात आहेत. उमेदवारांचे हे अचानक निर्माण झालेले पाहून सर्वसामान्यांना आश्चर्याचा धक्का बसत असून आतून नागरिकही सुखावत आहेत.  

गुपशी मुक्त संवाद

फिरायला जाणाऱयांचे मॉर्निंग ग्रुपही आहेत. या ग्रुपची संख्या मोठी आहे. चालता चालता या ग्रुपमध्ये राजकीय चर्चेला तोंड फुटते. ग्रुपमधील सर्वच एका पक्षाचे किंवा विचाराचे नसतात. यामुळे त्यांच्यामध्ये अमूक एका उमेदवारांने काय विकास काय केला किंवा दुसरा काय करणार,रात्री एखादय़ा उमेदवारांने कोठे मटणाच्या जेवणावळी दिल्या, कोणाचे पारडे कसे जड आहे या गल्लीबोळातील चर्चेपासून नमो- रागा ते ट्रम्पपर्यंतच्या चर्चेवर वाद विवाद होतात. अशा ग्रुपला गाठून त्यांच्याशी मुक्त संवाद साधण्याचे काम उमेदवारांच्या कार्यकर्त्यांकडून  केले जात असून टपरीवर सकाळच्या चहाचे घोट घेत मतदान करण्याचे आवाहन केले जात आहे.