|Monday, August 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » सत्तेत येताच स्वतंत्र कृषी अर्थसंकल्प

सत्तेत येताच स्वतंत्र कृषी अर्थसंकल्प 

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची घोषणा

प्रतिनिधी/ चिकोडी/निपाणी

कर्नाटक, राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड या राज्यांमध्ये सत्तेवर येताच काँगेसने दिलेल्या वचनाप्रमाणे शेतकऱयांची कृषीकर्जे माफ केली. याउलट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न करता केवळ 15 उद्योगपतींची साडेतीन लाख कोटींची कर्जे माफ केली. काँगेस पक्ष हा गोरगरिब व शेतकऱयांसाठी काम करणारा पक्ष असून या निवडणुकीत सत्तेत येताच देशात शेतकऱयांसाठी स्वतंत्र कृषी अर्थसंकल्प मांडून त्याद्वारे शेतकऱयांचा आर्थिक दर्जा सुधारणार आहोत, अशी घोषणा राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली.

चिकोडी लोकसभा मतदारसंघाचे काँगेस-निजद युतीचे अधिकृत उमेदवार खासदार प्रकाश हुक्केरी यांच्या प्रचारार्थ येथील आर. डी. हायस्कूल क्रीडांगणावर आयोजित विराट सभेत ते बोलत होते. राहुल गांधी पुढे म्हणाले, पाच वर्षांपूर्वी पंतप्रधान मोदी यांनी दिलेली आश्वासने पाळली नाहीत. खोटी आश्वासने देऊन सत्तेत आलेल्या नरेंद्र मोदींनी नोटाबंदी व गब्बरसिंग टॅक्स लादल्याने बेरोजगारी वाढली. आज मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे प्रतिदिन 27 हजार जणांना नोकऱया गमावाव्या लागत आहेत. स्वतःला देशाचा चौकीदार म्हणवून मोदी हे अनिल अंबानी, निरव मोदी, विजय मल्ल्या यासारख्या कर्जबुडव्या उद्योगपतींचे चौकीदार बनले आहेत.

देशात आपली सत्ता येताच प्रथम गरिबीवर सर्जिकल स्ट्राईक करत देशातील 20 टक्के गरीब महिलांच्या खात्यावर प्रत्येक वर्षी 72 हजार रुपये याप्रमाणे पाच वर्षात 3 लाख 60 हजार रुपये देणार आहोत. याचा लाभ 25 कोटी गरीब लोकांना होणार आहे. हा पैसा आपण अंबानी, मल्ल्या, मोदी यांच्या खिशातून काढून घेऊन गरिबांना देणार आहोत. तसेच मोदी यांचा रोजगार निर्मितीचा दावा फोल ठरला आहे. आम्ही मात्र प्रथमतः देशातील 22 लाख सरकारी रिक्त पदे भरून घेण्याबरोबरच पंचायत स्तरावर 10 लाख युवकांना रोजगार देणार आहोत.

युवा उद्योजकांना प्रोत्साहन देणार

देशात अनेक युवकांमध्ये उद्योजक बनण्याची क्षमता आहे. अशा युवकांना नवा उद्योग सुरू करण्यासाठी लागणाऱया परवानगीची अट तीन वर्षे शिथील करून त्यांना प्रोत्साहन देण्याबरोबरच अर्थसाहाय्य करणार आहोत. भारतीय संस्कृतीच्या परंपरेची जोपासना करण्याचे भाष्य करणाऱया मोदींनी आपल्या गुरूंचीही फसवणूक केली आहे. सत्तेपूर्वी अडवाणींना गुरू मानणारे मोदी आज त्यांना नमस्कार करण्याकडेही दुर्लक्ष करत आहेत.

यावेळची ही निवडणूक व्यक्तीविरुद्ध नसून विचारधारेविरुद्ध आहे. एकीकडे भाजप मोदी, आरएसएस, अन्याय, खोटेपणा आणि द्वेषाची भावना आहे. तर दुसरीकडे काँग्रेस, न्याय, सत्य, अहिंसा आणि बंधुता आहे. त्यासाठी सुज्ञ मतदारांनी काँग्रेस आघाडी सरकारला संधी देण्यासाठी येथील विकासरत्न खासदार प्रकाश हुक्केरी यांना निवडून द्यावे, असे आवाहन राहुल गांधी यांनी केले.

स्वकीयांद्वारे घटना बदलण्याचे भाष्य

माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले, केंद्रातील मोदी सरकारने 2014 च्या निवडणुकीत दिलेली आश्वासने पूर्ण तर केलीच नाहीत. पण त्यांनी ईडी, इन्कमटॅक्स, सीबीआय, आरबीआय, निवडणूक आयोग या सरकारी यंत्रणांना दुर्बल बनवत त्याचा दुरुपयोग करून हुकूमशाही चालवली आहे. त्यांना भारतीय संविधान व लोकशाहीवर विश्वास नसल्याने ते आपल्या स्वकीयांद्वारे घटना बदलण्याचे भाष्य करवून घेत आहेत.

इतकेच नव्हे तर भाजपाने दलित, अल्पसंख्यांक व इतर मागासवर्गीयांना उमेदवारी देण्याचे टाळून जातीय राजकारण केले जात आहे. अशावेळी मागासवर्गीय नेते म्हणवून घेणारे ईश्वरप्पा गप्प का आहेत. आपण मुख्यमंत्री असताना शेतकऱयांना कर्जमाफी करण्याबरोबरच विविध योजना राबविताना गोरगरिब व शेतकऱयांना प्राधान्य दिले. चिकोडी भागातील ऊस उत्पादक शेतकऱयांना प्रतिटन 150 रुपये याप्रमाणे 1800 कोटी रुपयांचे अनुदान दिले.

उमेदवार पाहून मत द्या

भाजपची नेतेमंडळी लोकसभेच्या निवडणुकीतील उमेदवाराला पुढे न करता मोदींचा चेहरा दाखवून मतयाचना करत आहेत. आम्ही मात्र स्थानिक खासदार प्रकाश हुक्केरी यांनी केलेली विकासकामे दाखवून व हुक्केरींनाच पुढे करून मतयाचना करत आहोत. त्यामुळे मतदारांनीही स्थानिक उमेदवार पाहून प्रकाश हुक्केरींनाच निवडून द्यावे, असे आवाहन केले.

1 लाखांचे मताधिक्य मिळणार

पालकमंत्री सतीश जारकीहोळी म्हणाले, गतवेळच्या निवडणुकीत मोदी लाटेतही कत्तींविरोधात प्रकाश हुक्केरी विजयी झाले. आता मोदींची लाट मंदावल्याने तसेच कत्ती विरोधात नसल्याने प्रकाश हुक्केरी यांचा 1 लाखाहून अधिक मतांनी विजय निश्चित आहे. भाजप नेते विकासकामांवर बोलण्याऐवजी धर्म, जात व काश्मीरचा विषय घेऊन मतदारांच्या मनात गोंधळ निर्माण करून पुन्हा सत्तेत येण्याची स्वप्ने पहात आहेत. मात्र सूज्ञ मतदारांनी याला बळी न पडता विकासरत्न प्रकाश हुक्केरी यांना निवडून द्यावे, असे आवाहन केले.

यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष दिनेश गुंडूराव, आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, श्रीमंत पाटील, महेश कुमठहळ्ळी, माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी आमदार शहाजहान डोंगरगाव, के. पी. मग्गेण्णावर, जि. पं. अध्यक्षा आशा ऐहोळे, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे आदींनी मनोगते व्यक्त केली. यावेळी व्यासपीठावर खानापूरच्या आमदार अंजली निंबाळकर, महांतेश कौजलगी, गणेश हुक्केरी, माजी आमदार काका पाटील, ए. बी. पाटील, डी. टी. पाटील, मोहन शहा, केपीसीसी उपाध्यक्ष वीरकुमार पाटील, रावसाहेब पाटील, गोपाळदादा पाटील, ऍड. सतीश कुलकर्णी, नरेंद्र नेर्लीकर, महावीर मोहिते, विलास गाडीवड्डर, राजेश कदम, मोहन बुडके, रवी मिरजे, इरगौडा पाटील यांच्यासह काँग्रेस, निजदचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.