|Monday, August 26, 2019
You are here: Home » Top News » साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरला निवडणूक आयोगाची नोटीस

साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरला निवडणूक आयोगाची नोटीस 

 

ऑनलाईन टीम / भोपाळ  :   दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या  तेव्हाचे एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांच्याबद्दल वादग्रस्त विधान करणारी भाजप उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरला निवडणूक आयोगाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

साध्वी भोपाळमधून लोकसभेची निवडणूक लढवत असून भोपाळचे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सुदाम खाडे यांनी साध्वीला बजावण्यात आलेल्या नोटिशीबाबत आज माहिती दिली.

साध्वी प्रज्ञाच्या विधानाची आम्ही गंभीर दखल घेतली आहे. याबाबत सहाय्यक निवडणूक अधिकाऱयांकडून अहवाल मागवण्यात आला आहे. शिवाय संबंधित कार्यक्रमाचे आयोजक आणि साध्वीला याक्षणी नोटीस बजावण्यात येत असून 24 तासांत त्यावर उत्तर देणे अपेक्षित आहे, असे जिल्हाधिकाऱयांनी नमूद केले. सहाय्यक निवडणूक अधिकाऱयांकडून अहवाल येताच तो केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठवला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

भोपाळ उत्तर विधानसभा मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात साध्वी प्रज्ञाने करकरेंबद्दल वादग्रस्त विधान केले होते. या कार्यक्रमाच्या परवानगीबाबत विचारले असता काही अटींवर या कार्यक्रमाला परवानगी देण्यात आली होती, असे खाडे यांनी स्पष्ट केले.